आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह करण्यासाठी दिला जाणारा भत्ता वाटप केला जाणार आहे. त्याकरिता महापालिकेने १,९१३ दिव्यांग लाभार्थ्यांची यादी जाहीर केली असून त्यांच्या उदरनिर्वाह भत्त्यासाठी २ कोटी २३ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
एप्रिल ते सप्टेंबर 2022 दरम्यान सहा महिन्याचा हा उदरनिर्वाह भत्ता लगेचच दिव्यांगाच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याची माहिती दिव्यांग कक्षप्रमुख तथा उपायुक्त नंदा गायकवाड यांनी दिली.
महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी १७ कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय, रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासोबतच प्रधानमंत्री घरकुल योजनेत दिव्यांगासाठी घरे उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगाचे आरोग्य शिबीर, शिक्षणामध्ये सवलत यासह त्यांच्या उदरनिर्वाहासाठी रोख स्वरूपात भत्ता दिला जाणार आहे. त्याकरिता महापालिकेच्या एकूण बजेटच्या ५ टक्के निधी दिव्यांगावर खर्च केली जाणार असल्याचे प्रशासक चौधरी यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मनपाने दिव्यांग कक्ष स्थापन केला असून झोन कार्यालयामार्फत नोंदणी केलेल्या दिव्यांगाची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी तयार करताना चार प्रकार करण्यात आले आहे. दिव्यांग लाभार्थींच्या बॅक खात्यावर सहा महिन्याचा उदरनिर्वाह भत्ता जमा केला जाणार आहे.
शुन्य ते १३ वर्षेवयोगटातील मुलांना दरमहा ५०० रुपये तर १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना दरमहा एक हजार रूपये शिष्यवृत्ती देण्यात येईल. त्यासोबतच ४० ते ७९ टक्के अपंगत्व आलेल्या दिव्यांग लाभार्थींना उदरनिर्वाह भत्ता म्हणून दरमहा २ हजार रूपये आणि ८० ते १०० टक्के अपंगत्व आलेल्या व्यक्तींना उदरनिर्वाह भत्ता म्हणून दरमहा ३ हजार रूपये दिले जातील.
दिव्यांग व्यक्तींची यादी जाहीर झाल्यानंतर यामध्ये ३३० दिव्यांग मुलांचा समावेश आहे. शुन्य ते १३ वर्षे मुलांना दरमहा ५०० रुपये प्रमाणे आणि १४ ते १८ वर्षापर्यंत असलेल्या मुलांना दरमहा १ हजार रूपये याप्रमाणे ३३० मुलांना शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. तसेच १५२१ लाभार्थींना उदरनिर्वाह भत्ता, १७ लाभार्थींना बेरोजगार भत्ता आणि ४५ लाभार्थींना पेन्शन भत्ता मिळणार आहे.
शहरातील दिव्यांगांची नाव नोंदणी १ ते ९ झोन कार्यालयात केली जात आहे. आतापर्यंत १९१३ दिव्यांग लाभार्थ्यांनी नाव नोंदणी केली असून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.