आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकृष्णनगरात कारवाई:भविष्य सांगून, हातचलाखी करत महिलांना लुटणारे 2 भोंदू अटकेत; एकट्या महिला असलेल्या घरात जाऊन करायचे लुबाडणूक

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कवड्याची माळ, भगव्या कपड्यावरून वाटायचे साधू

भविष्य सांगण्याचे खाेटे आमिष दाखवून दाेन भाेंदूबाबा शहरात घुसून लूटमार करत असल्याच्या दाेन घटना घडल्या. याबाबत पाेलिसांपर्यंत तक्रार गेल्यानंतरही त्याची भीडभाड न बाळगता दाेन भामट्यांनी शनिवारी जवाहरनगर परिसरात एका घरात घुसून फसवणुकीचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाळत ठेवून असलेल्या गुन्हे शाखेने या दाेघांना श्रीकृष्णनगरमधून अटक केली. योगेश खंडू सोळंके (२७) विश्वनाथ नारायण शिंदे (३२) अशी आराेपींची नावे आहेत. सिडकाे एन-४ मध्ये राहणाऱ्या चेतना भावसार (३६) या २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जे सेक्टरमध्ये आत्याच्या घरी गेल्या होत्या. गुरुपौर्णिमा असल्याने या दिवशी भिक्षा मागत दोन भोंदूबाबा आत्याच्या घरासमोर उभे राहिले. पै

से देऊ केले तर नकार दिला, फक्त चहाची मागणी करत घरात प्रवेश केला. त्यानंतर पूजा, भविष्य सांगण्याचे नाटक करत त्यांनी चेतना यांच्या हातावर कुंकू दिले. त्याच दरम्यान हातचालाखीने त्यांच्या हातातील तीन ग्रॅम वजनाची व हिराचा खडा असलेली साडेतीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी मिळवून दोन्ही भोंदूबाबांनी पोबारा केला. या घटनेची तक्रार दाखल झाल्यामुळे पोलिस सतर्क झाले. मात्र पुन्हा जिन्सी परिसरात याच पद्धतीने भाेंदूबाबाने एका ४० वर्षीय महिलेच्या घरात प्रवेश करून तिचे आठ हजार रुपये लुटल्याचेही समाेर आले. याबाबत जिन्सी पोलिसांत तक्रार दाखल झाली. अशा वाढत्या घटनांनंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल देशमुख यांनी पथकासह आराेपींचा शोध सुरू केला.

भाेंदूच्या वर्णनाचे दाेन संशयित श्रीकृष्णनगरमध्ये वावरत असल्याची माहिती खबऱ्यांकडून पाेलिसांना मिळाली. त्यावरून अमोल देशमुख यांच्यासह अंमलदार सुधाकर मिसाळ, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर पवार यांनी सापळा रचून त्यांना एका सुशिक्षित कुटुंबाच्या घरातून बाहेर पडताच ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर अटक करून मुकुंदवाडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

पाेलिसांकडून शाेध, तरीही लुबाडणूक सुरूच
बारावीपर्यंत शिकलेला योगेश व विश्वनाथ यांचा भटकंती करून भविष्य सांगण्याचा पिढीजात व्यवसाय आहे. ही २५ ते ३० कुटुंबे शहराबाहेर झाेपड्यात वास्तव्य करतात. पुरुष गावात भिक्षा मागून भविष्य सांगण्यासाठी फिरतात. हिंगोली तालुक्यातील कोथळज, मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील असलेले कुटुंब सध्या करमाडजवळील हिवरा फाट्यावर वास्तव्यास आहे. शुक्रवारी या भाेंदूबाबांच्या कारनाम्याच्या बातम्या वृत्तपत्रात छापून आल्या, पाेलिसांनी त्यांचा शाेधही सुरू केला. तरीही थाेडीही भीडभाड न ठेवता या दाेघांनी शनिवारी पुन्हा लूटमारीचा धंदा सुरूच ठेवला.

कवड्याची माळ, भगव्या कपड्यावरून वाटायचे साधू
दाेन्ही आराेपी फेटा, कवड्याची माळ, भगवे कपडे परिधान फिरायचे. अंगावर कातडी पिशवी, खंजीर वाद्य, देवांच्या मूर्ती, तांदूळ, खोबरा वाटी, हळद, राशीचे खडे, रुद्राक्ष ते सोबत बाळगतात. कपाळावर मोठे भस्म, गंध लावून शक्यतो पुरुष नसलेल्या घरात प्रवेश करतात. त्यानंतर भस्म, कुंकवाने पूजा केल्याचे नाटक करतात व आकर्षक गप्पांनी भुरळ पाडतात. जिन्सीत आश्चर्यकारकरीत्या भस्म, कुंकू उडवल्यानंतर महिलेने स्वत:हून त्यांना साडेसात हजार रुपये, स्वयंपाकघरातील तेलाच्या पिशव्या, मीठ देऊ केले. तसेच याचवेळी आलेल्या जावयालाही ५०० रुपये या भाेंदूंना देण्यास सांगितले. मात्र, दीड दाेन तासांनंतर महिलेला आपण फसल्याची जाणीव झाली.

आराेपी म्हणाले : लाेकच भूलथापांना बळी पडतात अन‌् पैसे काढून देतात
शनिवारी श्रीकृष्णनगरमधील एका सुशिक्षित कुटुंबात दाेघे भाेंदू जाऊन बसले. तोपर्यंत अमाेल देशमुख यांचे पथक त्यांच्यापर्यंत पोहोचलेले होेते. हे भामटे बाहेर येण्याची वाट पाहिली. घराबाहेर येताच गाडीत बसण्यास सांगितले. पकडलो गेल्याचे कळताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या झोपडीतून दोन अंगठ्या, रोख ८ हजार जप्त केले. ‘तुम्हाला तुमचे अटकेचे भविष्य माहीत नव्हते का?’ असा प्रश्न पाेलिसांनी विचारला, त्यावर दोघांनी आपल्याला भविष्य वगैरे कळत नसल्याचे सांगितले. ‘आम्ही फक्त गाेड बोलून, अंदाजपंचे सांगतो. त्यातील काही सामान्य मुद्दे बरोबर निघतात, लाेक भुलतात अन‌् पैसे काढून देतात,’ अशी कबुली आराेपींनी दिली. अशा भामट्यांच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पाेलिसांनी केले.

बातम्या आणखी आहेत...