आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या पंधरा वर्षांपासून पोलिसांसाठी बातमीदार म्हणून ‘सर्व प्रकारचे’ काम सांभाळणाऱ्यालाच हप्ता मागणारे एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे डीबीचे कर्मचारी दयानंद ओहळ (रा. पिसादेवी रोड) आणि अविनाश गणेश दाभाडे (रा. सिध्दार्थनगर, एन-१२) यांना होळीच्या दिवशी ३ हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाचे काम पाहणारा दयानंद ओहळने हद्दीतील कोल्ड्रिंकच्या हॉटेलमध्ये दारूविक्री करण्यासाठी महिना ५ हजार रुपयांचा हप्ता लागेल, असे सांगितले. हॉटेल चालकाने याबाबत एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली.
धूलिवंदनाच्या दिवशी कधीही पैसे घ्यायला येऊ, असे पोलिस सांगून गेले होते. आटोळे यांच्या आदेशावरून निरीक्षक हनुमंत वारे यांनी अंमलदार शिरीष वाघ, साईनाथ तोडकर यांच्यासह मंगळवारी सकाळी ६ वाजेपासूनच सापळा रचला. साडेअकरा वाजता ओहळच्या सांगण्यावरून तक्रारदाराच्या हॉटेलवर पहिला हप्ता म्हणून ३ हजार रुपये घेताना दाभाडे मुद्देमालासह पकडला गेला. त्यानंतर ओहळला अटक करण्यात आली. तक्रारदार एमआयडीसी सिडको पोलिसांचा गेल्या १५ वर्षांपासून खबऱ्या, बातमीदार, पोलिसमित्र म्हणून काम करतो. वरिष्ठांच्या खास समजल्या जाणाऱ्या डीबी पथकाने त्यालाच लाच मागितली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.