आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचा पुढाकार:पहिल्याच दिवशी 10 हजार 724 विद्यार्थ्यांना 2 गणवेश ; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका प्रशासनाने शाळेच्या पहिल्याच दिवशी (१३ जून) इयत्ता पहिली ते आठवीच्या दहा हजारांवर विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १३ जून रोजी १० हजार ७२४ विद्यार्थ्यांना नवीन दोन गणवेश दिले जाणार आहेत. काेराेनामुळे गत दोन वर्षांपासून दोनऐवजी एकच गणवेश मिळाला होता. शासनाच्या समग्र शिक्षा अभियानातून मनपा शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश दिले जातात. शहरात महापालिकेच्या एकूण ७१ शाळा आहेत. मराठी व उर्दू माध्यमाच्या सर्व मुली, एससी-एसटी प्रवर्गातील मुले आणि दारिद्र्यरेषेखालील सर्व मुलांना मोफत गणवेश वाटप केले जातात. विद्यार्थ्यांची संख्या १० हजार ७२४ आहे. या सर्वांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यासाठी ६४ लाख ३४ हजार ४०० रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मान्यता दिली आहे. प्रति गणवेश ६०० रुपये देणार आहेत. गणवेशाची रक्कम त्या-त्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यावर जमा केली आहे, अशी माहिती समग्र शिक्षा अभियानचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी दिली. १३ जून रोजी शाळा सुरू होणार आहेत. या दिवशी पात्र सर्व विद्यार्थ्यांना नवीन गणवेश आणि नवीन पाठ्यपुस्तके समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून देणार असल्याचेही सांगळे यांनी स्पष्ट केले.

मोफत गणवेशासाठी पात्र विद्यार्थी मुली ५,५९३ एससी १७६३ एसटी ७५ दारिद्र्यरेषेखालील ३२९३ एकूण पात्र १०७२४

शाळांच्या १० केंद्रांसाठी आता दहा मेंटॉरची नियुक्ती

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत मनपा प्रशासनाने ‘स्मार्ट एज्युकेशन’ उपक्रम हाती घेतला आहे. शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केंद्रनिहाय दहा मेंटॉर नियुक्त केले आहेत. या मेंटॉरची पहिली बैठक गुरुवारी प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद येथे प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. कलिमोद्दीन शेख, उपायुक्त नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, अधिव्याख्याता डॉ. विशाल तायडे, डॉ. राजेश चौधरी, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, मुख्याध्यापक शशिकांत उबाळे व दहा मेंटॉर शिक्षक यांच्या उपस्थितीत झाली. यात प्रत्येक केंद्राचा मार्गदर्शक आराखडा (व्हिजन डॉक्युमेंट) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी डॉ. कलिमोद्दीन शेख यांनी प्रत्येक केंद्रासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात यावे अशी सूचना केली. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी दिल्लीच्या धर्तीवर शहरातील मनपा शाळांमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी शैक्षणिक धोरण आखले आहे. यासाठीच स्मार्ट एज्युकेशन उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत मनपा शाळांच्या इमारतींचे बांधकाम, भौतिक सुविधा अधिक स्मार्ट करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार आता विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व शिक्षकांना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे यासाठी मनपा शाळांच्या दहा केंद्रांसाठी दहा मेंटॉरची नियुक्ती केली आहे. शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण उपलब्ध करून देऊन मेंटॉरच्या मदतीने शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी नियोजन करण्याचे बैठकीत ठरले. या बैठकीचे प्रास्ताविक व संचालन ज्ञानदेव सांगळे यांनी केले. शशिकांत उबाळे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...