आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळेधारकांना मनपाच्या तोंडी सूचना:संजय गांधी भाजी मार्केटमधील 20 अतिक्रमणे काढली

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाने मंगळवारी टीव्ही सेंटर येथील संजय गांधी भाजी मार्केटमधील २० अतिक्रमणे काढली. तसेच सिडको एन-५ मधील ८ अनधिकृत व्यावसायिक दुकानेही निष्कासित केली. ही कारवाई आैरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार केली. संजय गांधी भाजी मार्केटमधील नागरिकांनी प्रवेशद्वारामध्येच अतिक्रमण केले होते. सुमारे २५ फुटांचा हा रस्ता प्रस्तावित असताना अतिक्रमणधारकांनी तो ३ फुटांचाच शिल्लक ठेवला होता. गेल्या १५ दिवसांपूर्वी या सर्व अतिक्रमणांमधील गाळेधारकांना मनपाने तोंडी सूचना दिल्या होत्या. सर्व भाजीपाला कच्चा असतो, त्याचे नुकसान होऊ नये, म्हणून या सूचना दिल्या होत्या. मात्र, एकाही भाजी विक्रेत्यांनी आणि टपरीधारक व दुकानदारांनी अतिक्रमण काढले नाही.

त्यामुळे मनपा पथकाने मंगळवारी कारवाई केली. सर्वप्रथम जेसीबीच्या साह्याने मुख्य प्रवेशद्वारालगत असलेल्या चार लोखंडी टपऱ्या निष्कासित केल्या. त्यानंतर या रस्त्यात भाजी विक्रेत्यांनी तीन बाय सहा असे दहा ओटे तयार करून रस्ता तीन फुटांचा केला होता. तेदेखील अतिक्रमण काढले. जय बालाजी भाजी सेंटर, भारत भाजी सेंटर, अथर्व फळे भाज्या विक्री केंद्र यांचे दोन दुकाने हटवून पूर्ण २० फुटांचा रस्ता मोकळा केला. या ठिकाणी राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या अतिक्रमणधारकांच्या तीन टपऱ्या आणि शेडदेखील डॉ. चौधरी यांच्या आदेशानुसार काढले. आता हा अहवाल डॉ. चौधरी यांना सादर करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी सांगितले.

सिडको नाट्यगृह परिसरातही अतिक्रमणे सिडको एन-५ येथील भोला पान सेंटर ते संत तुकाराम नाट्यगृह या ठिकाणची ८ दुकाने जमीनदोस्त केली. यात नाट्यगृहाच्या मागील बाजूस असलेल्या ३ दुकानांचा समावेश आहे. ही कारवाई करताना अतिरिक्त आयुक्त-२ रवींद्र निकम स्वतः उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अन्य दुकानांवर आज कारवाई टीव्ही सेंटर भाजी मार्केटमध्ये इतर ४ दुकानदारांनी दहा बाय दहा आकाराची दुकाने रोडवर बांधलेली आहेत. त्यांना मंगळवारच्या कारवाईत अंतिम सूचना दिल्या. त्यामध्ये कच्चा भाजीपाला ठेवलेला असल्याने उद्या त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. या कारवाईमुळे येथील दुकानदारीला देखील प्रतिबंध बसला आहे.