आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाळूज येथील कामगार चौकात 250 वाहने उभी राहतील, तसेच चालक व क्लिनरची सर्व सोय होईल असे सुविधायुक्त ट्रक टर्मिनल एमआयडीसी प्रशासनाने उभारलेले आहे. मात्र, तरीही वाळूज औद्योगीक परिसरातील कारखान्यांच्या रस्त्यासमोर दुतर्फा नियमीत 300 पेक्षा आधिक वाहने उभी दिसतात. नुकतेच दैनिक दिव्य मराठीने केलेल्या पाहणीतून हे वास्तव निदर्शनास आले.
वाहतूक पोलिसांनी अनाधिकृतरित्या रस्त्याच्या कडेला उभा राहणाऱ्या वाहनांवर वेळीच दंडात्मक कारवाई केली तर निश्चितच रस्त्याच्या कडेला उभी राहणारी वाहने ट्रक टर्मिनलच्या दिशेने वळतील. अशी अपेक्षा येथील वाहनधारक कामगार-उद्योजकांतून व्यक्त होत आहे.
ट्रक टर्मिनलमध्ये केवळ 20 टक्के वाहने, उर्वरीत रस्त्यावरच कामगार चौक येथे 3.5 एकर जागेवर भव्य ट्रक टर्मिनल उभारण्यात आले आहे. याठिकाणी 250 वाहने उभी राहतील एवढी क्षमता आहे. औद्योगीक परिसरात लहान-मोठे 3 हजार 700 कारखाने आहेत. कारखान्यात दररोज 400 पेक्षा आधिक अवजड वाहने मालाची ने-आण करण्यासाठी येतात. मात्र, त्यातील केवळ 20 टक्के वाहने टर्मिनलमध्ये उभी राहतात. उर्वरीत 80 टक्के म्हणजेच 320 पेक्षा आधिक वाहने कारखान्यांसमोरील रस्त्यांवर बिनदीक्कत उभी केली जातात.
वाहने ट्रक टर्मिनलमध्ये उभी न करण्याची कारणे? सध्या एकमेव सुरू असणारे ट्रक टर्मिनल कामगार चौकात आहे. याठिकाणी ए सेक्टर ते एफडीसी चौकाच्या परिसरातील कारखान्यात माल घेवून येणाऱ्या वाहनधारकांना वगळता, एनआरबी चौक ते मायलॉन, युनायटेड ब्रेव्हरेज, सिमेन्स तसेच जोगेश्वरी परिसरातील एम सेक्टर परिसरात माल घेवून येणाऱ्या वाहनधारकांना 5 ते 7 किमीचे अंतर असल्याने ते ट्रक टर्मिनलमध्ये वाहने उभी करणे टाळतात. त्याशिवाय पैसे वाचवणे, माल लोडिंग-अनलोडिंग करण्यासाठी असणारी ‘लॉबी’ असेही कारणे ट्रक चालकांशी संवाद साधल्यानंतर पुढे आली.
ट्रक टर्मिनलसाठी ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दर एमआयडीसी प्रशासनाकडून 1 एप्रिल 2022 मध्ये 23 लाख 496 रूपयांत (जिएसटी वगळून) एका खाजगी संस्थेला ट्रक टर्मिनल 11 महिन्यांच्या करारावर चालवण्यास दिलेले आहे. कोणत्या वाहनांकडून किती शुल्क आकारावेत याचे दरही एमआयडीसी प्रशासनाने निश्चित करून दिले आहेत.
सदरील दरापेक्षा कमी शुल्क आकारण्याची मुभा आहे, मात्र, त्यापेक्षा आधीक शुल्क आकारता येणार नाहीत असेा स्पष्ट उल्लेख कराराच्या नियमांत नमुद आहे. यात 4 टायर वाहन-30 रूपये, 6 टायर-60 रूपये तर 10 व त्यापेक्षा आधिक टायरच्या वाहनांसाठी 100 रूपये प्रति 12 तासांकरीता या प्रमाणे आहेत. मात्र, प्रत्यक्षात 10 ते 20 रूपये कमी दराने शुल्क आकारणी केली जात असल्याचे निदर्शनास आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.