आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक शेतातच उपटून फेकून देण्याची वेळ:टोमॅटोच्या 20 किलोच्या एका क्रेटला 20 रुपये भाव, शेतकरी संकटात

प्रतिनिधी | नामपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी पाऊस व गारपिटीमागे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. टोमॅटो पीक शेतकऱ्यांना तारणार हे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या शेतकऱ्यांवर बाजारभाव नसल्याने टोमॅटो पीक शेतातच उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. आजमितीस टोमॅटोच्या २० किलोच्या एका क्रेटला फक्त २० ते ३० रुपये भाव मिळत आहे. मागील महिन्यातही क्रेटला ५० रुपयांपर्यंच भाव होता. यामुळे टोमॅटो उत्पादक अडचणीत सापडला आहे.

बागलाण तालुक्यातील बिजोटे येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी सुपडू सजन ह्याळीज यांनी २० गुंठ्यात पाच हजार टोमॅटो रोपांची लागवड केली होती. या पिकासाठी नांगरणी, बांधणी, खत भरणी, ड्रीप, मल्चिंग, रोप लागवड, विविध औषध फवारणी, ड्रीपमधून खत सोडणे, पाणी सोडणे, सुतळी, बांबू, तार यासाठी ७५ हजार रुपये खर्च करून टोमॅटो पीक उभे केले. टोमॅटो कमी दिवसात जास्त नफा देऊन जाणारे पीक असल्याने बहुतांश शेतकरी टोमॅटोची लागवड करतात. ह्याळीज यांनी मेहनतीने चांगले पीक तयार केले होते. व्यापाऱ्यांना अपेक्षित प्रतीचा टोमॅटो तयार होऊनही व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. अवकाळी पावसाने टोमॅटोचे अतोनात नुकसान केले होते. दरम्यान, टोमॅटोला बाजारभाव नसल्याने पदरात एक रुपयाही पडणार नसल्याने मेटाकुटीस आलेल्या सुपडू ह्याळीज यांनी शेतातच टोमॅटो उपटून फेकली आहेत.