आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नराधमाला 20 वर्षे सक्तमजुरी:मित्राच्‍या घरी डांबून अल्पवयीन मुलीवर केला होता अत्‍याचार, साथीदाराला 3 महिने सक्तमजुरी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपीला ठोठावलेल्या दंडापैकी २० हजार रुपये पुर्नवसनासाठी पी‍डितेला देण्‍याचे आदेश

अल्पवयीन मुलीला मित्राच्‍या घरी डांबून ठेवत धमकी देत तिच्‍यावर अत्‍याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी आणि नराधमाला गुन्‍ह्यात मदत करणाऱ्या साथीदाराला तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश के.आर. चौधरी यांनी सोमवारी (१२ डिसेंबर ) ठोठावली. विशेष म्हणजे आरोपीला ठोठावलेल्या दंडापैकी २० हजार रुपये पुर्नवसनासाठी पी‍डितेला देण्‍याचे आदेश देखील न्‍यायालयाने दिले.

अनिल ऊर्फ नंदु शेषराव शेलार (वय २३, रा. हुसैन कॉलनी) असे नराधमाचे नाव असून प्रकाश रतन सास्‍ते (वय ३०, रा. भोकरदन जि. जालना, ह.मु. हुसैन कॉलनी) असे गुन्‍ह्यात नराधमाला मदत करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

नेमके प्रकरण काय?

प्रकरणात १६ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २७ मार्च २०१९ रोजी सकाळी दहा वाजेच्‍या सुमारास पीडिता ही गल्लीत उभी होती. त्‍यावेळी तिच्‍या ओळखीचा तथा आरोपी अनिल ऊर्फ नंदु शेलार हा तेथे आला व तुला काही सांगायचे आहे, असे म्हणत पीडितेला आरोपी प्रकाश सास्‍ते याच्‍या घरी आणले. पीडितेला घरात बोलावून दरवाजा बंद केला. त्‍यानंतर आरोपीने मला काही काम आहे, ते मी करुन येतो, असे म्हणत पीडितेला घरात बंद करुन तेथून निघून गेला. सायंकाळी आरोपीने पीडितेला जेवण आणले. त्‍यावेळी प्रकाश सास्‍ते देखील तेथे आला. पीडितेने अनिल ऊर्फ नंदुला विचारणा केली असता, त्‍याने तु चूपचाप येथे रहा, नाहीतर तुला माहित आहे, मी कसा आहे, तुला सोडणार नाही असे म्हणुन पीडितेला तेथेच दोन दिवस डांबुन ठेवले.

४ एप्रिल २०१९ रोजी दुपारी आरोपी नंदु दारु पिवून आला पीडितेला जेवण दिल्यानंतर त्‍याने जीवे मारण्‍याची धमकी देत तिच्‍यावर अत्‍याचार केला. ७ एप्रिल २०१९ रोजी आरोपी एका लग्नाला गेला, त्‍यावेळी प्रकाश तुला घरी जायचे तर जा, मी काहीही म्हणार नाही, असे पीडितेला म्हणाला. त्‍यानंतर पीडितेची सुटका झाली. प्रकरणात पुंडलिकनगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

प्रकरणात तत्कालीन उपनिरीक्षक महादेव पुरी यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवळी सहायक लोकाभियोक्ता ज्ञानेश्‍वरी नागुला/डोली यांनी ४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी अनिल ऊर्फ नंदु शेलार याला भादंवी कलम ३७६ (२)(आय) अन्‍वये १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड, पोक्सोच्‍या कलम ४ (२) अन्वये २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड, आरोपी अनिल ऊर्फ नंदु आणि प्रकाश सास्‍ते या दोघांना भादंवी कलम ३४२, ३४ अन्‍वये तीन महिने सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन हवालदार शेख रज्जाक यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...