आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणारास 20 वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत तिच्यावर बलात्कार करणारा आरोपी सुनील देविदास वाहुळ (२३) यास २० वर्षे सक्तमजुरी व विविध कलमांखाली एकूण ४१ हजार ५०० रुपयांचा दंड जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी सुनावला. विशेष म्हणजे गुन्ह्यात पीडित मुलगीच फितुर झाली होती. त्यावेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी पीडितेची उलट तपासणी करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. त्यानंतर अॅड. शिरसाठ यांनी केलेल्या उलटतपासणीत पीडितेने घडलेल्या घटनेची कबुली दिली.

या प्रकरणात १४ वर्षीय पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. त्यावरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. १७ मार्च २०१५ रोजी रात्री पीडिता दिसत नसल्याने फिर्यादीने त्याच्या लहान मुलीकडे विचारणा केली. त्यावर तिने, पीडिता व आरोपी परिसरातील किराणा दुकानासमोर उभे होते. तेव्हा आरोपीने पीडितेला माझ्यासोबत लग्न कर नाही तर जिवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर दोघे तेथून गेल्याचे सांगितले.

तपासादरम्यान पोलिसांनी २० मार्च २०१५ रोजी जाधवमंडी येथून पीडितेला ताब्यात घेत आरोपीला अटक केली. पीडितेचा जबाब घेतला असता, तिने सांगितले की, आरोपी व पीडिता एकाच परिसरातील असल्याने ते एकमेकांवर प्रेम करू लागले. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक निर्माण केली. आरोपी पीडितेला अश्लील चित्रफीत दाखवत व पीडितेलादेखील चित्रफितीप्रमाणे कृत्य करायला सांगत होता. लग्न करणार असल्याने पीडितेनेदेखील त्यास सहमती दर्शवली होती. आरोपी पीडितेशी बलात्कार व अनैसर्गिक कृत्य करताना मोबाइलमध्ये त्याचे चित्रण करून ते पीडितेला दाखवत होता.

या प्रकरणात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी सुनील वाहुळला दोषी ठरवून पोक्सोच्या कलम ४ अन्वये २० वर्षे सक्तमजुरी, २५ हजारांचा दंड, कलम ८ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी, ५ हजारांचा दंड, कलम १२ अन्वये एक वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, भादंवी कलम ३६३ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी ५०० रुपयांचा दंड, कलम ३७६ (२)(आय) अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

या प्रकरणात अॅड. शिरसाठ यांना अॅड. तेजस्विनी जाधव यांनी साहाय्य केले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार शेख रज्जाक यांनी काम पाहिले.

५० रुपयांचे मंगळसूत्र घेऊन लग्न
पीडितेने १७ मार्च २०१५ रोजी आरोपीला फोन करुन आपण पळून जावून लग्न करु, तू परिसरातील एका अंगणवाडीजवळ भेटण्यास सांगितले. त्यानुसार, आरोपी तेथे आला त्यानंतर ते दोघे २० मार्च २०१५ राेजी पटेलनगर, पिसादेवी भक्तीनगरात फिरले. १९ मार्च २०१५ रोजी त्यांनी पिसादेवी परिसरातील एका दुकानातून ५० रुपयांचे मनी मंगळसुत्र घेतले व हर्सुल येथील हरसिध्दी मातेच्या मंदिरात लग्न केले. २० मार्च रोजी पोलिसांनी दोघांना जाधवमंडीतून ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...