आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना विषाणूमुळे माणूस माणसापासून दुरावला आहे. विषाणूचा धोका असल्याने रक्ताचे नातेवाईकही दुरावले आहेत. लांबचे नातेवाईक तर मृतदेहाजवळही येत नाहीत. कुणी बाधित होऊ नये म्हणून डॉक्टरांनाही याची काळजी घ्यावी लागते. अशा वेळी तोंडाला मास्क, हँड ग्लोव्हज, अंगात घातलेली किट, पायावाटे निघणाऱ्या घामाच्या थेंबांचा त्रास सहन करीत शवगृहातून मृतदेह ताब्यात घ्यायचा. कुजलेला, छिन्नविच्छिन्न झालेल्या शरीराचे भाग उचलून ते शववाहिनीत ठेवून स्मशानाची वाट धरावी लागते. स्मशानभूमीत गेल्यानंतर नातेवाईक लांब थांबतात. मृतदेह पूर्ण पॅकबंद असतो, मृताचा फक्त चेहरा दिसतो. १०१७ कोरोनाबाधितांपैकी २२ मृतदेहांना पालिका कर्मचाऱ्यांनीच कधी मुलगा, कधी बाप तर कधी भाऊ बनून अग्निडाग दिला. तर पाणी पाजून अंत्यविधी पार पाडावे लागले आहेत.
कोरोना विषाणूचा कहर संपूर्ण राज्यात चालू आहे. त्यात जालना जिल्हाही मागे राहिलेला नाही. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असून, मृतांचा आकडाही दररोज वाढत आहे. दरम्यान, कोरोना असल्यास त्या व्यक्तीला भेटण्यासही जाता येत नाही. मृत्यू झाला की रुग्णालय प्रशासनच बॉडी पूर्ण पॅक करून शवगृहाकडे पाठवते. या ठिकाणाहून नगरपालिकेचे कर्मचारी मृतदेह अॅम्ब्युलन्समध्ये टाकून अंत्यविधी करण्यासाठी घेऊन जातात. मृतांचे नातेवाईकही या प्रसंगी असतात. धार्मिक विधी पार पडावा म्हणून नातेवाईक किट घालून तो विधी पूर्ण करतात. परंतु, एका-एका कुटुंबात कोरोना झाल्याने अनेक उद्ध्वस्त झाले आहेत. जवळचे नातेवाईक कुणीच राहिले नसल्यामुळे लांबचे नातेवाईक बऱ्याचदा या मृतदेहांजवळ येतही नाहीत. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर अंत्यविधी करून घ्यावे लागत आहेत.
मृतदेहाच्या दफनविधीसह मुक्तिधाममध्ये अंत्यसंस्कार
पालिका कर्मचाऱ्यांना हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मासह विविध समाजातील महिला, पुरुषांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. मुस्लिम असेल तर त्यांचा दफनविधी करावा लागतो. ख्रिश्चन असेल तर त्या धार्मिक विधीनुसार अंत्यविधी करावा लागतो. हिंदू धर्मानुसार मुक्तिधाममध्ये मृतदेहाला अग्निडाग देऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. मुक्तिधाममध्ये अंत्यसंस्कार होण्याचा आकडा सर्वात जास्त आहे.
अंत्यसंस्कारासाठी २५ जणांचे विशेष पथक
शवगृहातून कोरोना मृतदेह आणण्यापासून ते अंत्यविधी करेपर्यंत काळजी घ्यावी लागते. बेवारस, अनोळखी व्यक्ती असलेल्यांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. किट घातल्यानंतर सध्या उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो. काही मृतदेहांचे नातेवाईक लांबचे असल्यामुळे तसेच बेवारस मृतदेहांचे धार्मिक विधी आम्हालाच पार पाडावे लागतात. यासाठी २५ जणांचे विशेष पथक कार्यरत आहे. जिल्हाधिकारी, आमदार, नगराध्यक्षा, सीओ हे सर्वजण आम्हाला वारंवार आमच्याशी संवाद साधून आरोग्याची काळजी घेतात. - अरुण वानखेडे, प्रमुख, कोरोना अंत्यविधी प्रमुख, जालना.
बेवारस मृतदेह आणताना अंगाला काटा
पंधरा दिवसांपूर्वी दोन मृतदेह तीन दिवसांनंतर आढळून आले होते. एक मृतदेह घरातच सडला होता. हा मृतदेह केवळ चादर टाकून पालिका कर्मचाऱ्यांना आणावा लागला. या मृतदेहाची दुर्गंधी सुटली होती. पोस्टमाॅर्टेम करून त्यावर तत्काळ अंत्यविधी करावा लागला. एका तरुणाने गळफास घेतल्यानंतर बाजूच्यांना दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार समोर आला. या लटकलेल्या मृतदेहातून अक्षरश: पाणी टपकत होते. परंतु, तो मृतदेह रुग्णालयातून आणून कसातरी अंत्यविधी करावा लागला.
मृताचे जवळचे नातेवाईक आलेच नाही
चार दिवसांपूर्वीच कुंभेफळ येथील एकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक न आल्याने दोन दिवस तो मृतदेह शवगृहात ठेवावा लागला. नंतर पोलिसांच्या मदतीने व लांबच्या नातेवाइकांच्या मदतीने त्या मृताचा अंत्यविधी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.