आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियम:22 अनफिट वाहनांना दंड आकारून पाठवले परत ; आरटीओचे पथक दहा दिवस करणार वाहनांची तपासणी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी राज्यातील नऊ आरटीओ विभाग १० एप्रिलपासून दहा दिवस वाहनांची तपासणी करणार आहेत. सोमवारी शहर आरटीओ हद्दीत पहिल्या दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत चार ठिकाणी २०८ वाहने तपासण्यात आली. तेव्हा टायर घासलेले, विना सीटबेल्ट सुसाट वाहने धावत असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने अडवताच ‘एवढ्या वेळेस जाऊ द्या, पुढील वेळेस नियमांचे काटेकोरपणे पालन करू’ अशी विनवणी चालक करत हाेते. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी २२ अनफिट वाहने चालकांचे समुपदेशन करून परत पाठवण्यात आली. काहींना दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आरटीओ विजय काठोळे यांनी दिली.

समृद्धी महामार्गावरून अनफिट वाहने सुसाट धावत असल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा हद्दीत पाच भीषण अपघात हाेऊन त्यात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर आरटीओंच्या हद्दीतही अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याची कारणे शोधणे व अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भीमनवर व राज्य रस्ता सुरक्षा कक्ष उपायुक्त भरत कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ९ आरटीओ विभाग दहा दिवस समृद्धी महामार्गावर थांबून वाहनांची तपासणी करणार आहे. त्याची सुरुवात सोमवारी झाली.

कारवाई टाळण्यासाठी पुढाऱ्यांना फाेन आम्ही चार चेकपोस्टवर वाहने थांबवून तपासणी करत आहाेत. पहिल्या दिवशी मी स्वत: दोन तास काही वाहने तपासली. तेव्हा वाहनांचे टायर घासलेले होते. योग्यरीत्या नायट्रोजन हवा भरलेली नव्हती. सीटबेल्ट असूनही लावलेले नव्हते. मागील प्रवाशांसाठी सीटबेल्ट नाहीत. वाहन परवाना नव्हता, वाहनांचे फिटनेस केलेले नव्हते. अशी वाहने सुसाट धावत असल्याचे दिसून आले. त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. २२ वाहनधारकांना परत पाठवले. काही वाहनधारक एवढ्या वेळेस जाऊ द्या, असा आग्रह करत होते. काही जण पुढाऱ्यांना फोन लावून बोलावे असा आग्रह धरत होते. पथक समोर असताना फोनवर बोलत वाहन चालवत होते, असे काठोळे यांनी सांगितले.

सकाळी १० ते सायं.७ पर्यंत तपासणी सावंगी-नागपूर कॉरिडॉर एंट्रीवर माधवी चत्रे, प्रदीप राठोड, सावंगी-शिर्डी एंट्रीवर पूजा कुचे, शिवाजी पुंगळे, वेरूळ एंट्रीवर दीक्षा आढाव, कांचन जाधव, वैजापूर-नागपूर एंट्रीवर मकरंद जायभाये व राजश्री सोळके, गंगाराम भागडे यांनी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाहनांची कसून तपासणी करून चालक व प्रवाशांचे समुपदेशन केले.

सीटबेल्ट लावा, जीव वाचवा दोन दिवसांपूर्वी सावंगी येथे अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. सीटबेल्ट लावला असता तर दोघांचे प्राण वाचले असते, असे आरटीओ काठोळे म्हणाले.