आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत तपासणी:वृद्धाश्रमातील 112 आजी-आजोबांची डॉक्टरांकडून 23 वर्षांपासून नि:स्वार्थ सेवा

औरंगाबाद / गिरीश काळेकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक जण सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजूंना मदतीचा हात देत आहेत. काही जण कपड्यांच्या स्वरूपात मदत करतात, तर कोणी अन्नदानाच्या माध्यमातून भूक शमवतात. मात्र, कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय गेल्या २३ वर्षांपासून मातोश्री वृद्धाश्रमातील ११२ आजी-आजोबांना आरोग्याची काळजी घेत आहे. आयुष्यात समाजातील तळागाळातील लोकांसाठी, वृद्धाश्रमातील गरजवंत आजी-आजोबांसाठी काहीतरी करावे, त्यांची सेवा करावी, अशी संकल्पना संस्थेचे सचिव पद्माकर मुळे यांना सुचली. त्यातून वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची आरोग्यसेवा सुरू झाली.

दर गुरुवारी तपासणी, २५ जणांची टीम छत्रपती शाहू महराज शिक्षण संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालयातील रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नरेश निंबाळकर, डॉ. तुषार कुलकर्णी यांच्यासह १० ते १५ शिकाऊ डॉक्टर, ३ वैद्यकीय अधिकारी, तसेच ५ कन्सल्टंट व इतर मदतीस अशी २५ जणांची टीम वृद्धाश्रमात सेवा करते. दर गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ११२ ज्येष्ठांची मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्त, कान-नका-घसा, नेत्र अशा विविध प्रकारच्या तपासण्यांसह प्राथमिक उपचार करण्यात येतात.

७० ज्येष्ठांना उच्च रक्तदाब, मधुमेह-३०, स्मृतिभ्रंश-२०, ईएनटीचे ४० रुग्ण वृद्धाश्रमातील ७० ज्येष्ठांना उच्च रक्तदाब, ३० जणांना मधुमेह, २५ जणांना प्रोस्टेट ग्रंथीचा आजार, २० जणांना स्मृतिभ्रंश, तसेच ४० जणांना कान-नाक-घसा यांच्याशी संबंधित आजार आढळून आले. आतापर्यंत १ लाखांहून अधिक वेळा रुग्णांची तपासणी आणि औषधी वाटप करण्यात आलेली आहे. त्यांना अनेक पथ्ये पाळण्याचे, तसेच जेवणातील आहार संबंधित चार्टही देण्यात आला आहे. त्यांना वेळेवर औषधी देण्यासाठी कर्मचारी आहेत.

सकारात्मक भावनेतून कार्य अनाथ व वृद्ध लोकांची होणारी हालअपेष्टा बघवत नव्हती. आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या सकारात्मक भावनेतून सातत्याने अनेक वर्षातून आम्ही आरोग्यविषयक सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. - पद्माकरराव मुळे, सचिव

दुर्लक्षित घटकांसाठी मोफत सेवेचा प्रयत्न आयुष्यामधील उत्तरार्धात समाजातील वयोवृद्ध व्यक्ती दुर्लक्षित होतात. अशा दुर्लक्षित व्यक्तीपर्यंत मोफत आरोग्यसेवा २३ वर्षांपासून देत आहोत. - डॉ. श्रीकांत देशमुख, अधिकारी

बातम्या आणखी आहेत...