आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:2500 गावे अनाथ : 10 वर्षांपासून 114 नायब तहसीलदारांची भरतीच नाही

औरंगाबादप्रवीण | ब्रह्मपूरकर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, पालकमंत्री नाही म्हणून राज्याचा कारभार ठप्प झाल्याचे दिसत आहे. पण मराठवाड्यातील सुमारे २५०० गावे गेल्या दहा वर्षांपासून सरकारच्या कृपाछत्रापासून अनाथ झाल्याच्या स्थितीत आहे. कारण ग्रामीणमध्ये सरकारी कामकाज चालवण्याची जबाबदारी असलेल्या ११४ नायब तहसीलदारांची भरती दहा वर्षांपासून झालेली नाही. ४१९ पैकी ११४ जागा रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम कामावर होत आहे.

मराठवाड्यातील ७६ तालुके ४२१ मंडळात २४७६ तलाठी सज्जे ८५३६ महसुली गावे आहेत. खेडेगावांमध्ये लोकांसाठी मंत्र्यांपेक्षा महसूल यंत्रणा महत्त्वाची असते. नायब तहसीलदार, तलाठीच सरकार, मालक असते. नवनवीन कारणे पुढे करून दहा वर्षांमध्ये नव्या नायब तहसीलदारांची भरती रखडली आहे.

परभणी, हिंगोली : सर्वाधिक जागा औरंगाबाद जिल्ह्यात ५६ पैकी ४९ जागा भरलेल्या असून सात जागा रिक्त आहेत. जालन्यात ४७ पैकी ३३ जागा भरलेल्या असून १४ जागा रिक्त आहेत. परभणी जिल्ह्यात ४७ पैकी केवळ २९ जागा भरलेल्या असून १८ रिकाम्या आहेत. एकट्या परभणी जिल्ह्यात नायब तहसीलादाराच्या रिक्त पदांचे प्रमाण हे ४० टक्के इतके आहे. हिंगोलीत जिल्ह्यात २९ पैकी केवळ १५ जागा भरलेल्या आहेत.

दुष्काळी बीड : अडचणी अनंत मराठवाड्यातील दुष्काळी, मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड ५६ पैकी १९ जागा रिकाम्या असल्याने लोकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. नांदेड जिल्ह्यात ७५ पैकी ६४ जागा भरलेल्या असून ११ रिक्त आहेत. लातूर जिल्ह्यात ५४ पैकी ४० जागा भरलेल्या असून १४ रिक्त आहेत. उस्मानाबादमध्येही ४७ पैकी ३० जागा भरलेल्या असून इथेही १७ पदे रिक्त आहेत. इथे रिक्त पदांचे प्रमाण ३६ % आहे.

का असते हे सरकार? तहसीलदाराच्या निर्णयाची अंमलबजावणी नायब तहसीलदार गावांमध्ये करतात. ते महसुली कामकाजांतर्गत अर्धन्यायिक अधिकारी असतात. शेतजमिनीच्या वादाची पहिली सुनावणी तेच घेतात. स्वस्त धान्य, श्रावणबाळ, संजय गाधी निराधार योजना, मतदार नोंदणी, गौणखनिजसारखी महत्त्वाची जबाबदारीही त्यांच्याकडे असते. यामुळेच ग्रामीण भागामध्ये नायब तहसीलदार हेच सरकार असते.

केवळ सरकारी अनास्था हेच एकमेव कारण नाही दोन कोटी लोकसंख्येच्या मराठवाड्यासाठी किमान एक हजार नायब तहसीलदारांची गरज आहे. अर्थात जागा भरती रखडण्यामागे सरकारी अनास्था हे एकमेव कारण नाही. अनेक जण या पदावर दावा करून न्यायालयात गेले आहेत. सेवाज्येष्ठतेमुळेही भरती थांबल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव महेंद्र गिरगे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...