आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत:नऊ वर्षांत एमफिल, पीएचडीच्या 1,399 संशोधकांना 260 कोटींची बार्टी फेलोशिप

औरंगाबाद / डॉ. शेखर मगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने (बार्टी) ९ वर्षांत एमफिल, पीएचडीच्या १,३९९ विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली आहे. ही रक्कम सुमारे २६० कोटींपेक्षा अधिक आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध संशोधकांना दरमहा ३१ ते ३५ हजारांची फेलोशिप दिली जाते. बार्टीने शुक्रवारी (१९ ऑगस्ट) पुन्हा २०० संशोधकांना फेलोशिप देण्याचे घोषित केले आहे. त्यासाठी २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल १९८९ रोजी तत्कालीन राज्य सरकारने बार्टीची स्थापना केली होती. अनुसूचित जाती, बौद्ध आणि नवबौद्धांच्या विविध योजनांची बार्टीमार्फत अंमलबजावणी केली जाते. २०१३ दरम्यान बार्टीने संशोधकांना फेलोशिप देण्याचे जाहीर केले आणि २०१४ पासून फेलोशिप देणे सुरू केले. पहिल्यांदा १०१ जणांची निवड केली. २०१५ दरम्यान १०२, २०१६ मध्ये १०७, २०१७ मध्ये १००, तर २०१८ मध्ये ४०८ विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली. ७२ विद्यार्थ्यांना विशेष छात्रवृत्ती दिली. २०१९ आणि २०२० दरम्यान दोन वर्षांचे एकत्रित ५०९ विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली. अशी एकूण १,३९९ विद्यार्थ्यांना बार्टीने संशोधनासाठी फेलोशिप दिली आहे. एमफिलच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी दरमहा ३१ हजार तर पीएचडीच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी दरमहा ३५ हजार संशोधनासाठी दिले जातात.

९ वर्षांच्या कालावधीत १३९९ संशोधकांना २६० कोटी २१ लाख ४० हजारांची फेलोशिप दिली आहे. आता पुढील शैक्षणिक सत्रासाठी १ जून ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान ज्यांची विद्यापीठांनी संशोधनासाठी निवड केली आहे. अशा २०० विद्यार्थ्यांची बार्टीने पुन्हा जाहिरात काढली आहे. http://barti-maharshtragov.in या संकेतस्थळावर २५ ऑगस्ट ते २५ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. शंभर गुणांची लेखी, तर पन्नास गुणांची तोंडी मुलाखतीतील गुणवंत विद्यार्थ्यांची बार्टी निवड करणार आहे.

आम्ही आंदोलन, निवेदनाद्वारे पाठपुरावा करतो
बार्टीने २०१९ पासून फेलोशिप जाहीर केली नव्हती. आम्ही वारंवार आंदोलने केली. निवेदने दिली. त्यानंतर बार्टीने मागील वर्षी २०२१ दरम्यान ५०९ जणांची निवड केली. आता पुन्हा दोनशे संशोधकांना दिली जाईल. बार्टीची आर्थिक मदत मिळते म्हणून आम्ही संशोधन करू शकतो. अन्यथा पैशांअभावी पीएचडी करूच शकलो नसतो.
-शीलवंत गोपनारायण,संशोधक

बातम्या आणखी आहेत...