आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • 261 Police To Protect 211 Km Of Railways, How To Stop Looting? The Issue Of Safety Of Passengers Is On The Rise Again After The Robbery Of Potul | Marathi News

हतबल पोलिसांची व्यथा:211 किमी लोहमार्गाच्या संरक्षणासाठी 26 पोलिस, लूटमार रोखणार कशी? पोटूळच्या लूटमारीनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांची सुमारे २११ किलोमीटरची हद्द आहे. एवढ्या विस्तीर्ण परिसरात रेल्वेगाड्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी फक्त २६ पोलिसांवर आहे. त्यातच रेल्वेत रात्री-बेरात्री एखादा गंभीर गुन्हा घडला तर प्रवाशांना तक्रार करण्यासाठी थेट औरंगाबादचे स्थानक गाठावे लागते. अल्पवयीन आरोपींकडून रेल्वेत मोबाइल व पर्स चोरीच्या घटना नेहमीच घडतात, मात्र अपुऱ्या मनुष्याबळाअभावी हे गुन्हे रोखण्यात लोहमार्ग पोलिस अपयशी ठरलेले आहेत.

औरंगाबादपासून जवळच असलेल्या पोटूळ रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी (१ एप्रिल) रात्री नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये चार लुटारूंनी धुमाकूळ घालत सोन्याची चेन आणि मोबाइल लंपास केले. यानिमित्ताने रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेच्या मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोहमार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा दरोड्याचा प्रकार नसून किरकोळ गुन्हे आहेत, जे की नेहमीच घडतात. ज्या पद्धतीने गुन्हा घडला आणि आरोपींनी रेल्वेची चेन ओढून पळ काढला, त्यानुसार हा गंभीर प्रकार असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. गुन्हा घडल्यानंतर प्रवाशांना तक्रार देण्यासाठी औरंगाबादला यावे लागते. त्यानंतर पोलिस तपासाला सुरुवात करतात. यामुळे आरोपींना पसार होण्यास बराच वेळ मिळतो. खूप प्रयत्नांनंतर आरोपी निष्पन्न झाले तरी त्यातील बहुतांश आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर फारशी कडक कारवाई होत नाही. सुधारगृहातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा हे आरोपी तेच उद्योग सुरू करतात, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या सर्व समस्यांसंदर्भात लोहमार्गच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.

रेल्वेगाड्यांमधून मोबाइल चोरीचे प्रकार नित्याचेच, पोलिसही हतबल

आरोपी पारधी असल्याचा संशय
पोटूळ येथील लूटीच्या घटनेपूर्वी आरोपींनी कापड टाकून सिग्नल झाकला होता. यामुळे लोकोपायलटला (रेल्वेचालक) रेल्वे थांबवावी लागली आणि आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणातील आरोपी फासेपारधी असावेत, असा संशय लोहमार्ग पोलिस निरीक्षक साहेबराव कांबळे यांनी व्यक्त केला. फासेपारधी ज्या ठिकाणी चोरी करतात तिथे शौच करून जातात, असे आजवरचे निरीक्षण आहे. पोटूळ रेल्वेस्थानकाच्या बाजूला शौच केलेले दिसून आल्याने पोलिस या निष्कर्षापर्यंत पोहोचल्याचे कांबळे यांनी सांगितले.

आरपीएफचीही मदत मिळत नाही
रेल्वेस्थानकावर आणि रेल्वेत आरपीएफचे पोलिसदेखील असतात. पण त्यांची कोणतीही मदत आम्हाला मिळत नसल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. एखाद्या गुन्ह्यात श्वानपथकाला बोलवायचे झाले तर औरंगाबाद शहर अथवा परिक्षेत्रातील पोलिसांच्या श्वानपथकाची मदत घ्यावी लागते. त्यासाठी अनेकदा फोनाफोनी करावी लागते, त्यात वेळ जातो, असेही लोहमार्ग पोलिसांचे म्हणणे आहे.

गुन्हेगार नेमके कोण…?
लोहमार्गावर घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मोबाइल चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. वर्षभरात साधारण ५०० ते ७०० मोबाइल लंपास केले जातात. इतर चोऱ्यांचे प्रमाण शंभर ते दीडशेच्या घरात आहे. सेलू ते रोटेगाव परिसरातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसह शताब्दीनगर, नागपूर येथून येऊन गुन्हे करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश आरोपी अल्पवयीन आहेत. काही महिला प्रवासी म्हणून रेल्वेत चढतात आणि इतर प्रवाशांच्या पर्स चोरी करतात. चोरी करायची आणि सामान विकून आलेल्या पैशांची दारू प्यायची हा या चोरांचा नित्यक्रम असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपुरे मनुष्यबळ आणि बंदोबस्तात सतत ताण
२००६-०७ मध्ये औरंगाबाद लोहमार्ग पोलिस ठाणे झाले. त्या वेळी ५४ कर्मचारी संख्या मंजूर केली होती. मात्र आतापर्यंत संपूर्ण मनुष्यबळ भरले गेले नाही. सध्या फक्त ३० कर्मचारीच तैनात आहेत. त्यापैकी रजा, सुटी गृहीत धरली तर रोज फक्त २६ कर्मचारी कर्तव्यावर हजर असतात. त्यातच अधिकारी प्रभारी आहेत. या मनुष्यबळावर तपास, व्हीआयपी बंदोबस्त, रेल्वेचे अधिकारी, राज्याचे आरोग्यमंत्री, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांचे दौरे यांचा ताण असतो. कमी मनुष्यबळ व इतर बंदोबस्ताचा वाढता ताण यामुळे लोहमार्गावरील गुन्हे रोखण्यास वेळच मिळत नसल्याचे एका पोलिसाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

लोहमार्गच्या अनंत अडचणी
लोहमार्ग पोलिसांसमोर अपुऱ्या मनुष्यबळासह असंख्य अडचणी आहेत. यात प्रामुख्याने १) गुन्हा घडल्यानंतर तपासाच्या अनुषंगाने साधनसामग्री नाही. २) वायरलेस यंत्रणा नाही. ३) लँडलाइन फोन आहे पण तोदेखील नादुरुस्त. ४) संगणक अत्यंत जुने आणि खराब झालेले आहेत. ५) स्टेशनरी उपलब्ध होत नाही. ६) सक्षम अधिकाऱ्यांची वानवा ७) रेल्वे गेटला आरपीएफ सुरक्षा नसल्याने गुन्हेगारी वाढत आहे.

मनुष्यबळासाठी पत्रव्यवहार केलेला आहे
मनुष्यबळ कमी आणि लोहमार्ग पोलिस ठाण्याची हद्द मोठी आहे. मनुष्यबळ वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केलेला आहे. पोटूळच्या प्रकरणात आमचा तपास सुरू आहे. लवकरच आरोपी आमच्या ताब्यात असतील, असा आम्हाला विश्वास आहे.
- साहेबराव कांबळे, पोलिस निरीक्षक, लोहमार्ग पोलिस ठाणे

बातम्या आणखी आहेत...