आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी ताब्यात:27 दिवसांपूर्वी 84 टायर लांबवले, जामिनावर सुटताच पुन्हा दुकान फोडले; चोरीचा ऐवज विकत घेणारा व्यापारीदेखील अटकेत

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना रस्त्यावरील २७ दिवसांपूर्वी (७ एप्रिल) टायरचे गोडाऊन एकट्यानेच फोडून ८४ टायर चोरलेल्या निसार अहेमद ऊर्फ सलमान खान गफार पठाण ऊर्फ जाफर खान (२४) २७ एप्रिलला जामिनावर सुटला. त्यानंतर त्याने २८ एप्रिलला शेंद्र्यातील एका हार्डवेअरचे दुकान फोडून एका रिक्षासह एकूण सात लाखांचा ऐवज पुन्हा एकट्यानेच लांबवला. चिकलठाणा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेत निसारकडून चोरीचा माल विकत घेणाऱ्या जय लक्ष्मी ट्रेडर्स दुकानाचे मालक संजय पाटीललादेखील अटक केली.

व्यापारी बालचंद रमेश मालपाणी (३६, रा. प्रतापनगर, उस्मानपुरा) यांचे शेंद्रा भागात हार्डवेअरचे दुकान आहे. ते २८ एप्रिलला सायंकाळी दुकान बंद करून घरी गेले. मात्र, मध्यरात्री चोराने शटर उचकटवून दुकानातील ३०० किलो वजनाचे बायडिंग वायर, १६५ किलो लोखंडी खिळे, दुकानासमोरील लोखंडी सळई आणि पिकअप रिक्षा लंपास केली. निरीक्षक देविदास गात, सहायक निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला.

हा प्रकार निसारने केल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. पथकाने तत्काळ त्याचा शोध घेत अटक केली. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय जाधव, सहायक फौजदार गजानन लहासे, श्रीमंत भालेराव, दीपक सुरवसे, मनीषा चौधरी, आनंद घाटेश्वर यांनी केली.

शेंद्र्यात चोरी, सात लाखांचा ऐवज चोरून नेला
जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने निसारला अटक केली. जामिनावर सुटका झाल्यानंतर घरी जाऊन पायी शेंद्र्याकडे फिरत गेला. त्यात हार्डवेअरचे बंद दुकान फोडले. तेथील रिक्षात मुद्देमाल भरून निघाला. मात्र, रिक्षा वरुड काझी येथे बंद पडली. ती तेथे सोडून घरी गेला. अंघोळ करून नारेगावात जाऊन माझी रिक्षा बंद पडल्याचे सांगून सय्यद उमरच्या लोडिंग वाहनात ऐवज टाकून तो पाटीलला विकला. निसारमुळे दोघांची कारागृहात रवानगी झाली. पाटीलकडून पोलिसांनी चोरीचा ७ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...