आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे ४८ लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले. राज्य शासनाने १७ नोव्हेंबर रोजी १२१४ कोटींची भरपाई मदत देण्याचा अध्यादेश काढला. पण ती रक्कम आलीच नाही. दुसऱ्या टप्प्यातील भरपाईचेही १५०० कोटी मिळालेले नाहीत. राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने हा प्रकार होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
१७ नोव्हेबर रोजी १२ लाख १८ हजार ९२ शेतकऱ्यांचे ८ लाख ५७ हजार हेक्टरचे नुकसान नोंदवले गेले. जिल्हानिहाय शेतकऱ्यांना किती रक्कम नुकसान भरपाई, मदत म्हणून द्यावी, हेही जाहीर झाले. त्याचा तपशील असा. औरंगाबाद जिल्हा २ लाख ८६ हजार शेतकरी - २६८ कोटी. जालना ३ लाख ६९ हजार ६८० शेतकरी - ३९७ कोटी. परभणी - ९२, ३७७ शेतकरी - ७६ कोटी ३९ लाख. हिंगोली ५४, ८७६ शेतकरी - १६ कोटी ८० लाख. नांदेड - ४७,३६८ शेतकरी - २५ कोटी ५३ लाख. बीड - ३ लाख ५१हजार ६३४ शेतकरी - ४१० कोटी. लातूर - १५७८७ शेतकरी - १९ कोटी ९० लाख. अध्यादेशानंतर चार दिवसात पैसे जमा होतात. मात्र, आता तिजोरीत पैसाच नसल्याने यंत्रणा ठप्प असल्याचे अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.
१५०० कोटींचीही प्रतीक्षा : संततधार पावसामुळे मराठवाड्यात १७ लाख ५२ हजार १५८ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यांच्यासाठी १५०१ कोटीचा मदतीचा प्रस्ताव मंजूर आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ३८६ शेतकऱ्यांना ४२७ कोटीचा मदत मिळणे अपेक्षित आहे. पण ही रक्कमही अजून आलेली नाही.
लबाडाचे आवतण : अंबादास दानवे या सरकारला शेतीतील काही कळत नाही. शेतकऱ्यांविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री संवेदनशील नाहीत, हे मी या पूर्वी वारंवार सांगितले. तेच आता सिद्ध होत आहे. शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी, अब्जावधी रुपयांच्या घोषणा करायच्या. पण तिजोरीत पैसा आहे की नाही, हे बघायचे नाही, असा या सरकारचा पवित्रा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत हे लबाडाच्या घरचे आवतण आहे. जेवल्याशिवाय ते कळणार नाहीच.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.