आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधर सिनेटसाठी 45 अर्ज:10 जागांसाठी राष्ट्रवादीच्या 19 जणांची 27 नामांकने, जुन्या 8 चेहऱ्यांना मिळणार संधी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पदवीधरमधून ४५ नामांकने दाखल झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उत्कर्ष पॅनलने १० जागांसाठी १९ जणांनी २७ अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित १८ अर्जांत अपक्ष, शेकापच्या उमेदवारांचा समावेश आहे. उत्कर्षच्या १८ पैकी १० उमेदवार निश्चित झाले असून त्यात ८ चेहरे जुनेच असण्याची दाट शक्यता आहे.

अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळ या प्राधिकरणांच्या निवडणुकांचा कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी तथा कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर अधिसभेतून निवडून येणाऱ्या १० जागांसाठी २६ नोव्हेंबरला मतदान होइल. खुल्या प्रवर्गातून-५, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जाती व इतर मागास आणि महिलांमधून प्रत्येकी एका उमेदवाराची निवड केली जाणार आहे. २७ ऑक्टोबरपासून अर्जांची सुरुवात झाली होती. १ नोव्हेंबरला ७ अर्ज, तर २ नोव्हेंबरला ३८ अर्ज दाखल झाले. आत्तापर्यंत ४५ नामांकने दाखल झाली आहेत. यात खुल्या प्रवर्गातून सर्वांधिक २२, महिला-३, अनुसूचित जाती-२, अनुसूचित जमाती-१, इतर मागास प्रवर्गातून-५, तर भटके विमुक्तांच्या एका जागेसाठी तब्बल १२ अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या उत्कर्ष पॅनलच्या सर्व संभाव्य उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. त्यात ८ चेहरे जुनेच निश्चित केले जातील, अशी चिन्हे दिसत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी नामांकन मागे घेण्याची मुदत आहे.

‘उत्कर्ष’ची १० जागांसाठी १८ नामांकने : उत्कर्षच्या १८ इच्छुकांनी नामांकन दाखल केले आहे. त्यात मावळते व्यवस्थापन परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी डॉक्टर्स आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे आणि त्यांच्या पत्नी डॉ. हर्षा काळे यांनीही नामांकन दाखल केले आहे. दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळणार आहे. खुल्या प्रवर्गातून आमदार विक्रम काळे यांचे निकटवर्तीय हरिदास सोमवंशी यांची उमेदवारी नक्की मानली जात आहे. भारत खैरनार, चंद्रकांत चव्हाण, रमेश भुतेकर, जहूर शेख, विजय पवार, संभाजी भोसले, पंडित तुपे यांनीही नामांकन दाखल केले आहे. पण, यांच्यापैकी भारत खैरनार, जहूर शेख, रमेश भुतेकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महिलांमधून मीनाक्षी शिंदे निश्चित आहेत. प्रा. संभाजी भोसले, दत्तात्रय भांगे यांच्यापैकी एक भटक्या विमुक्तांतून फायनल होण्याची शक्यता आहे.

यंदा भटक्यातून विजयी होणाऱ्यांना व्यवस्थापन परिषदेत जाणे सुकर होणार आहे. महेश उबाळे, अक्षय बाहेती, योगिता पाटील यांनीही नामांकन दाखल केले आहे. इतर मागास वर्गातून सुभाष राऊत, राजीव काळे, सय्यद सज्जाद इक्बाल यांच्यापैकी सुभाष राऊत किंवा राजीव काळे यांना उमेदवारी मिळेल. विमुक्त जातीतून हर्षा काळे यांच्याव्यतिरिक्त संजय काळबांडे, विठ्ठल गडदे, संभाजी भोसले, रखमाजी कांबळे यांचे अर्ज आहेत. अनुसूचित जमातीतून सुनील निकम, तर अनुसूचित जातीतून सुनील मगरे यांनाच उमेदवारी मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...