आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाप्रलयंकारी भूकंपाची 27 वर्षे:भूकंपात वडिलांचे छत्र हरवले, माणुसकीच्या नात्याने मिळाली दोघा भावंडांना उभारी

गिरीश भगत | लोहारा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आईने मोलमजुरी करून शिकवलेली भावंडे सरकारी नोकरीत

३० सप्टेंबर १९९३ ला पहाटे झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपात अनेक नात्यांची कायमची ताटातूट झाली. पण, रक्ताची तुटलेली काही नाती माणुसकीच्या धाग्याने घट्ट झाली आणि पुन्हा एका नव्या जीवनाची सुरुवात झाली. बघता बघता या घटनेला आज २७ वर्षे होत आहेत. मागे वळून पाहताना राखेतून उठलेल्या जिद्दीच्या, परिश्रमाच्या यशकथाही पहायला मिळतात. भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या किल्लारीजवळील मुर्शदपूरच्या बनसोडे भावंडाच्या जीवनाचा प्रवास प्रेरणादायी आहे. वडील गेल्यानंतर आई, मामा आणि समाजातील लोकांच्या मदतीने तसेच कष्टाने शिक्षण घेतलेले हे भावंड सध्या सरकारी नोकरीत आहेत. २७ वर्षांतला त्यांचा हा प्रवास.

दादासाहेब मारुती बनसोडे सांगतात, भूकंप होऊन २७ वर्षे झाली. परंतु आयुष्याला पडलेल्या भेगा तशाच आहेत. त्या जीवघेण्या आहेत. भूकंपात वडिलांचं छत्र हरपून पोरका झालेला मी व माझा भाऊ. नेमका भूकंप कसा झाला, होत्याचं नव्हतं कसं झालं, हे फक्त ऐकलंय. पण माझ्या कुटुंबावर आघात झाला तो मात्र कायमचा. किल्लारीपासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असणारं मुर्शदपूर गाव. माझ्या कुटुंबातील कर्ता पुरुष माझे वडील या भूकंपात कायमचे हरवले. मी व माझे कुटुंब पोरकं झालो. माझी आई तेव्हा वीस वर्षांची होती. मी साधारण एक वर्षाचा तर माझा लहान भाऊ अवघ्या दोन महिन्यांचा होता. वडिलांच्या मृत्यूमुळे आई भेदरून गेली होती. घरची परिस्थिती बिकट होती. त्यात करता पुरुष नसलेलं पोरकं कुटुंब यामुळे आम्ही होरपळून जाऊ, हे माझ्या आजोबांनी ओळखलं. त्यामुळं त्यांनी आम्हाला त्यांच्या गावी उदतपूर येथे घेऊन गेले. आजोबांचीही परिस्थिती बिकट होती. तरीसुद्धा त्यांनी दिलेला आसरा, प्रेम, संस्कारातून आमची जडण-घडण झाली. माझी आई-आजोबा, आजी, दोन्ही मामा यांनी वडिलांची उणीव भासू दिली नाही. आईने तर आम्हाला घडवण्यासाठी जिवाचं रान केलं. वेळप्रसंगी रोजगार केला, बांधकामावर कामाला गेली आणि आम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलं. आपल्या गरिबीवर मात करण्यासाठी शिक्षण हा एकच पर्याय आहे, असं नेहमी आई आमच्या मनावर बिंबवत होती. महत्त्वाचं म्हणजे आईनं निर्व्यसनी राहण्याची शपथ दिली तसेच चारित्र्य जपायला शिकवलं. त्यामुळे शिक्षणात मी कधीच मागे राहिलो नाही. माझे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदतपूर येथे झालं. तावशीगड येथील बालाजी विद्यालयात दहावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कठीण परिस्थितीतही माझे मामा प्राध्यापक महादेव सोनटक्के व प्रशांत सोनटक्के यांनी पुढील शिक्षणासाठी मला पुणे येथे नेलं. २००९ साली बा. रा. घोलप महाविद्यालय येथून बारावी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची परिस्थिती नव्हती. परंतु त्याच काळात माझे मामा महादेव सोनटक्के प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि लहान भाऊ पण भारतीय सेनेत रुजू झाला. या दोघांनी माझ्या शिक्षणाचा भार उचलला. पुण्याच्या नामांकित एस. पी. कॉलेजमधून २०१३ साली बीएस्सी विशेष प्रावीण्यासह पदवी मिळवली. पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातून २०१५ ला ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयात एमएस्सी प्रथम श्रेणीत पूर्ण केली. त्यानंतर अनंतराव पवार महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून काम करू लागलो. २०१६ मध्ये सेट व नेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालो. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेत सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच महाराष्ट् लोकसेवा आयोगामार्फत २०१७ मध्ये घेतल्या गेलेल्या सहायक रासायनिक विश्लेषक ही परीक्षा व मुलाखत उत्तीर्ण होऊन सध्या सहायक रासायनिक विश्लेषक (गट - ब, राजपत्रित अधिकारी) या पदावर प्रा. न्या. वै. प्रयोगशाळा अमरावती, गृह विभाग येथे कार्यरत आहे. माझा भाऊही भारतीय सेनेत कार्यरत आहे. जिद्द आणि परिश्रमाची तयारी असेल तर मोडून पडल्यानंतरही भरारी घेता येते, याचा ठाम विश्वास वाटतो.

बातम्या आणखी आहेत...