आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लातूर येथील १९९३ च्या भूकंपात घराच्या भिंतीखाली गाडली गेली होती दीड वर्षाची प्रिया. सहाव्या दिवशी ती बचाव पथकाला सुखरूप सापडली. दिल्ली येथील इमॅन्युअल हॉस्पिटल असोसिएशनने भूकंपग्रस्तांसाठी रुग्णालय आणि शाळा उभारली. आज या संस्थेतच शिक्षिकेची नोकरी करतेय प्रिया. आज लातूर भूकंपाला २७ वर्षे पूर्ण होताहेत. त्यानिमित्त चमत्कारिकरीत्या सापडलेल्या प्रियाच्या भूकंपातील आठवणी व तिचा २७ वर्षांचा प्रवास तिच्याच शब्दांत...
भूकंप झाला त्या वेळी मी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. मला सहाव्या दिवशी बाहेर काढण्यात आले. मला ते काहीच माहीत नव्हते. माझ्या वडिलांनी मला हे पहिल्यांदा सांगितले त्या वेळी मी आठ वर्षांची होते. भूकंपाचे नाव काढले तरी आजही अंगावर सर्रकन काटा उभा राहतो. मला ओळखणारे लोक अजूनही मला बघून ही ढिगाऱ्याखाली सापडलेली मुलगी म्हणतात. असे संकट पुन्हा कोणत्याही गावावर येऊ नये, अशी मी देवाकडे प्रार्थना करते.
कुटुंबातील ९ जण मृत्युमुखी :
१९९३ च्या भूकंपात हजारो लोक मृत्युमुखी पडले. भारतीय सैन्य बचाव व शोधकार्यासाठी किल्लारीतील भूकंपग्रस्त भागात आले. औसा तालुक्यातील मंगरूळ येथे बचावकार्य सुरू होते. बचावकार्य सुरू होऊन ५ दिवस उलटले होते. एका कुटुंबातील जवळपास नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्या कुटुंबातील एक व्यक्ती सैन्यातील एका अधिकाऱ्याजवळ आला आणि म्हणाला, साहेब, माझी दीड वर्षाची मुलगी आणखी सापडली नाही. तिचा शोध घ्या. त्या वेळी त्या मुलीच्या वडिलांच्या विनंतीवरून त्या अधिकाऱ्याने परत एकदा तिच्या घरात शोधकार्य सुरू केले. या वेळी ढिगाऱ्याखाली पहाटेच्या सुमारास मी दीड वर्षाची प्रिया त्यांना सापडली. मात्र या भूकंपात माझ्या कुटुंबातील नऊ जण मृत्युमुखी पडले होते. - शब्दांकन : गिरीश भगत.
अध्यापनाचे काम करताना आनंद, आता संकटात सापडलेल्यांना मदत करायचीय
भूकंपानंतर दिल्लीतील इमॅन्युअल हॉस्पिटल असोसिएशनने रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. दापेगाव येथे ‘गुड मॉर्निंग प्रिया’ (जी.एम.प्रिया) हॉस्पिटल उभारले. या संस्थेने दापेगाव येथे १९९४ साली एक हॉस्पिटल उभारले. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण गावात म्हणजे मंगरूळ येथे झाले. त्यानंतर १२ वीपर्यंतचे शिक्षण औसा येथे झाले. त्यानंतर मी आटपाडी येथे डी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. संस्थेने दापेगाव येथे इमॅन्युअल पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. दहावीपर्यंतची ही शाळा आहे. मी आता याच शाळेत अध्यापनाचे कार्य करते आहे. अध्यापनाचे कार्य करताना मला आनंद मिळतो. आता संकटात अडकलेल्या लोकांना मदत करण्याची माझी इच्छा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.