आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभाचे व्याज:बँकांकडून 2900 कोटींच्या कर्ज वाटप मेळाव्याने उघडले राजकीय वादाचे खाते

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या पुढाकाराने १८ बँकांतर्फे आयोजित मेळाव्यात सोमवारी (५ सप्टेंबर) महाराष्ट्रात सुमारे २९५२ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील २३ हजार जणांना ९२५ कोटी रुपये मिळाले. यंदा पहिल्यांदाच अशा पद्धतीने झालेल्या आयोजनातून राजकीय वादाचे खाते उघडले. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी असा आरोप केला की, डाॅ. कराडांनी निवडणुकीचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या चेल्याचपाट्यांना कर्ज वाटप केले. त्यावर कराड म्हणाले की, त्यांनी यात एक तरी भाजपवाला दाखवून द्यावा. मी फक्त गरिबांना मदतीचा अजेंडा राबवत आहे. त्यामुळे कोणाच्या पोटात दुखत असेल तर मी काहीही करू शकत नाही.

भाजपच्या चेल्याचपाट्यांना कर्ज हा तर थेट निवडणुकीचा अजेंडा : खासदार इम्तियाज जणू काही मी माझ्या खिशातून पैसे देतोय, असे वातावरण डाॅ. कराड यांनी जाहिरातींतून तयार केले आहे. अशा कर्जवाटप मेळाव्यांना बँक कर्मचारी संघटनेने विरोध केला आहे. काँग्रेसच्या काळात जनार्दन पुजारी, एडवर्ड फेलोरो असेच कर्ज देऊन टाकत. तोच प्रकार डाॅ. कराड यांनी केला. भाजपच्या चेल्याचपाट्यांना (कार्यकर्त्यांना) त्यांनी पैसे वाटून टाकले. कोरोना संकटामुळे भाजी विक्रेते, हातगाडीवाले आदींना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे कर्ज देण्यासाठी बँकांनी अनेक अडथळे आणले. एकीकडे राष्ट्रीयीकृत बँका फक्त ६ टक्के शैक्षणिक कर्ज वाटतात. दुसरीकडे कोट्यवधींची उधळण करतात. तीदेखील फक्त भाजपसाठी. बँकांची ही गुलामगिरीची मानसिकता चुकीची आहे. मी खात्रीने सांगतो की, यातील फक्त २० ते ३० टक्केच लोक कर्जाचे नियमित हप्ते फेडतील. कारण भाजपची मंडळी हप्ता भरणारच नाहीत. हे माझे भाकीत आताच नोंदवून ठेवा.

भाजपचा एक तरी कर्जवाला दाखवा, उलट इतर पक्षांचेच अनेक लाभार्थी असतील : डाॅ. कराड अजिबात नाही. या कर्जवाटपात भाजपचा एक तरी कार्यकर्ता दाखवा. उलट इतर पक्षांचेच अनेक लाभार्थी असतील. कर्जासाठी अर्ज करणारा कोण कोणत्या पक्षाचा आहे, हे मला माहीत नाही. माझा अजेंडा गोरगरिबांना मदत करण्याचा आहे. या मंडळींनी कितीही आरोप केले तरी मी या अजेंड्यापासून हटणार नाही. एकीकडे विरोधक म्हणतात की, सरकारच्या मदत योजनांची जनतेला माहितीच कळत नाही. प्रचार, प्रसार होत नाही. आता मी जाहिरातींच्या माध्यमातून या योजना लोकांकडे पोहोचवतोय, माहिती देतोय तर यांचे पोट का दुखतेय? माझ्याआधी यांनी बँकांची मदत घेऊन कर्ज वाटप मेळावे का घेतले नाही? मी या खात्याचा जबाबदार मंत्री म्हणून फोटो दिला असेल तर त्यात काय चुकीचे आहे? शैक्षणिक कर्ज किंवा इतर काही मुद्दे असतील तर त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मी पुढाकार घेणार आहेच. कन्नड तालुक्यातही असा मेळावा घेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...