आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील विमानाच्या फेऱ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भरघोस ४५.७ टक्के, तर प्रवाशांच्या संख्येत तब्बल ८०.१ टक्के वाढ झाली आहे. या वाढीचा हा पॅटर्न राज्यातही कायम असून प्रवासी आणि विमानाच्या फेऱ्यांंमध्ये मोठे बदल दिसून आले. साडेपाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शिर्डी विमानतळाची सर्वाधिक भरभराट झाली असून विमानांच्या फेऱ्यांत २९६% भर पडली. पुणे १००%, मुंबई ५९% तर छत्रपती संभाजीनगर येथून ४६ टक्क्यांनी फेऱ्या वाढल्या. गोंदिया, काेल्हापूर, सिंधुदुर्गसारख्या छोट्या व तुलनेने नवीन विमानतळांची कामगिरी सुधारली असताना नांदेड, जळगावची कामगिरी घसरली.
भारतात एप्रिल २१-फेब्रुवारी २०२२ दरम्यान देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मिळून १५,६४,०६० विमानांच्या फेऱ्या झाल्या होत्या. एप्रिल २२ ते फेब्रुवारी २३ दरम्यान ही संख्या २२,७९,३२८ वर पोहोचली. वर्षभरात विमान वाहतुकीत ४५.७ टक्क्यांची वाढ झाली. या काळात प्रवासी संख्या १६,४४,५६,८९६ वरून २९,६२,६०,५५२ वर पोहोचली. यात ८०.१ टक्के वाढ नोंदवली गेल्याचे भारतीय विमान प्राधिकरणाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
गोंदियात फेऱ्यांत १२००%, सोलापुरात ९००% वाढ : गाेंदिया विमानतळाहून विमानाच्या फेऱ्या ४६ वरून ५५२ झाल्या. ही वाढ १२०० टक्के आहे. सोलापूरहून ८ ऐवजी ७२ फेऱ्या झाल्या. ही वाढ ९०० टक्के आहे. वाढीची टक्केवारी मोठी असली तरी प्रत्यक्षात विमानांची संख्या कमी आहे. जळगाव आणि नांदेडमध्ये विमाने घटली. या काळात आंतरराष्ट्रीय मालवाहतूक १७,८६,७१४ मेट्रिक टनहून १६,८९,६१७ वर घसरली. यात ५.४ टक्का घट झाली. देशातंर्गत मालवाहतूक १०,७०,८११ मे.टन वरून ११,८१,६०१ मे.टनवर आली. यात १०.३ टक्के वाढ झाली.
शिर्डीत प्रवासी वाढणार : ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरू झालेले शिर्डी विमानतळ पुणे, मुंबई व नागपूरनंतर राज्यातील सर्वात व्यस्त विमानतळ ठरत आहे. विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनलसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ५२७ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. सद्याच्या इमारतीत तासाला ३०० प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. नवीन इमारतीत व्यस्त वेळेमध्ये ताशी १२०० प्रवासी (पीक अवर्स पॅसेंजर-पीएचपी) हाताळता येतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.