आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोळंबल्या:जूनच्या 17 दिवसांत मराठवाड्यात पावसाची 29.8 % तूट ; सोयगाव-परंडा तालुक्यात सर्वात कमी,पेरण्याही खोळंबल्या

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा मराठवाड्यात मान्सून अपेक्षित वेळेनुसार दाखल झाला असला तरी मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पहिल्या आगमनाच्या काळातील कामगिरी फारशी समाधानकारक राहिलेली नाही. १ ते १७ जूनदरम्यान मराठवाड्यात ७५.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात त्याच्या फक्त ७०.८ टक्केच म्हणजे ५३.७ मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजे सरासरीपेक्षा २९.२ टक्के तूट आहे. गतवर्षी याच १७ दिवसांत १३३.४ मिमी पाऊस पडला होता. दरम्यान, पुढील पाच दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या आठवड्यात मान्सून अधिक सक्रिय होण्याची अपेक्षा आहे. हवामान बदलामुळे यंदा मान्सूनच्या आगमनात खोडा निर्माण झाला होता. कमी हवेचा दाब आणि वातावरणातील तापमान, आर्द्रता, बाष्प, उष्णता, हवेचा वेग यास कारणीभूत ठरल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. असे असले तरी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील शाखांमुळे आता दोन्ही बाजूने महाराष्ट्र व्यापला आहे. जेथे पोषक वातावरण तेथे चांगला पाऊस पडतोय. सुरुवातीच्या १७ दिवसांत मराठवाड्यातील ७६ पैकी २७ तालुक्यांत ८ ते ५० टक्के, तर १९ तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाले. उर्वरित २९ तालुक्यांत सरासरी ४७ ते ३ टक्क्यांपेक्षा कमीच पाऊस पडलेला आहे. एकूण ५६ तालुक्यांत अजून पेरणीस अनुकूल असा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

८७३ गावांत पाणीटंचाई, १०९ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा

{ गेल्या तीन वर्षांपासून चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे अजून पावसाने ओढ दिली असली तरी ८७५ प्रकल्पांत ३३.९९ टक्के पाणी आहे. लघु प्रकल्पात मात्र केवळ १७ टक्केच साठा आहे. { मराठवाड्यातील १०९ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण आहे. ८५२ विहिरींचे अधिग्रहण करून व ९३ टँकर्सद्वारे त्यांची तहान भागवली जात आहे. { याशिवाय ७६४ गावांतही पाणीटंचाईचे चटके बसत असल्याने तिथेही विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

हवेच्या जास्त दाबाने लांबला पाऊस

मार्च, एप्रिल, मे महिन्यात भारतीय भूपृष्ठावर हवेचा दाब जास्त राहिला. प्रतितास १ ते २ किमी हवेचा वेग होता. त्यामुळे जूनमध्ये पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. नैऋत्य मोसमी पावसाच्या वाटेतही अडथळा निर्माण झाला आहे. बंगल्याच्या उपसागरातील दुसऱ्या शाखेकडून बाष्प पाऊस घेऊन येत आहेत. पण जोपर्यंत नैऋत्य मोसमी पावसाचा मार्ग सुरळीत होत नाही तोपर्यंत पावसाचे वितरण सर्वसमान होणार नाही. बीड, परभणी जिल्हा सोडला तर इतर ठिकाणी अत्यल्प पाऊस झाला आहे. जमिनीत २ ते २.५ फूट खोल ओलावा पोहोचल्यानंतरच पेरणी करणे उपयोगाचे असते. त्यामुळे जोपर्यंत सरासरी ६५ मिमी पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. - डॉ. रामचंद्र साबळे, हवामान शास्त्रज्ञ, पुणे.

बातम्या आणखी आहेत...