आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेगवेगळ्या बँकांचे एटीएम कार्डवर क्लोन करून भामट्याने एकाच बँकेच्या एटीएममधून तब्बल ३ लाख २४ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. भामट्याने ५ नोव्हेंबर २०२१ ते १ फेब्रुवारी २०२२ या तीन महिन्यांत सेव्हन हिल्स येथील लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या एटीएममधून दुसऱ्या बँकांच्या ग्राहकांचे क्लोन केलेले एटीएम वापरत ही फसवणूक केली. याप्रकरणी लोकविकास बँकेचे व्यवस्थापक किशोर बळीराम वैद्य (५०, रा. प्लॉट नं. १०६, पेठेनगर, भावसिंगपुरा) यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
२७ जानेवारी रोजी वाळूज येथील छत्रपती राजर्षी शाहू बँकेचे व्यवस्थापक थोरे, करपे बँकेत आले. त्यांनी २६ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता त्यांच्या बँक खातेदाराच्या खात्यातून १३ हजार रुपये तुमच्या एटीएममधून एटीएम कार्ड खातेधारकाकडे असतानादेखील दुसऱ्याने परस्पर काढल्याचे सांगितले. त्यानंतर २८ जानेवारी रोजी स्टँडर्ड अर्बन लि. शाखेचे आय.टी. अधिकारी शैलेश यांनी देखील वैद्य यांना आमच्या खातेदाराच्या खात्यातून ६ हजार रुपये तुमच्या एटीएममधून काढल्याचे सांगितले. ही माहिती वैद्य यांनी त्यांच्या बँकेच्या आयटी व्यवस्थापकाला दिली असता, एटीएम कार्ड क्लोन करून खातेधारकांचे पैसे काढल्याचे स्पष्ट झाले. खातेधारकांच्या खात्यावरून ३ लाख २४ हजार ७०० रुपये लोकविकास बँकेच्या एटीएममधून काढल्याचे स्पष्ट झाले. या वेळी सीसीटीव्हीत एक व्यक्ती बराचवेळ एटीएम सेंटरमध्ये थांबल्याचे दिसून आले. तसेच, २-३ एटीएम कार्ड वापरून पैसे खिशात टाकताना देखील दिसल्याचे वैद्य यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक राजेश मयेकर तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.