आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यायालयासमोर सादर न करता ३० लाख लोकांना तुरुंगात टाकले आहे. त्यावर कोणी काहीही बोलत नाही, असा आरोप काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी बुधवारी (१ जून) येथे केला. सहाव्या-सातव्या आयोगाने गब्बर झालेल्या, स्वत:त मश्गुल मध्यमवर्गीयांना देशात काहीही झाले तरी आपल्याला काहीच त्रास होत नसल्याची भावना आहे, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले लिखित ‘हू किल्ड जज लोया’ पुस्तकाचे प्रकाशन केतकर, कन्हैयाकुमार यांच्या उपस्थितीत झाले त्या वेळी ते बोलत होते. प्रा. जयदेव डोळे, धम्मगंगा प्रकाशनचे कृष्णा साळवे, महात्मा गांधी भवनचे कार्याध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महात्मा गांधी स्मारक निधी, महात्मा गांधी भवन आणि धम्मगंगा प्रकाशन आयोजित कार्यक्रमात केतकर म्हणाले की, सुशांतसिंगच्या मृत्यूवर तीन महिने वाहिन्यांवर चर्चा झाली. लोयांच्या मृत्यूवर तीन तासही झाली नाही. पेट्रोल किती महागले हे जाणून घेण्याची मध्यमवर्गीयांची इच्छा सोशल मीडियाने मारून टाकली आहे. देशात आरबीआय, सीबीआय, न्यायालयीन व्यवस्था एकच भाषा बोलत आहेत. परदेशातले भारतीय कट्टर हिंदू झाले आहेत. मोदी ८० कोटी लोकांना ३५ किलो धान्य दिल्याचे सांगतात, मात्र ८० कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली असल्याचे त्यांना काहीच वाटत नाही.
पेट्रोलची नाही, ज्ञानव्यापीची चिंता : कन्हैयाकुमार
कन्हैयाकुमार म्हणाले की, हिंदू तत्त्वज्ञानानुसार ईश्वर सर्वत्र आहे. मग ज्ञानव्यापीची चिंता कशाला? पेट्रोल १५० रुपये झाले तरी देणे-घेणे नाही. तुम्ही सत्यासाठी लढणार नाही तोपर्यंत न्यायाधीश, पत्रकार, पोलिस काहीच करू शकणार नाहीत. पंजाबात आपल्यासमोर एका गायकाची हत्या झाली. त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. मी इथे येताना भगवा शर्ट घातला. त्याबद्दल एकाने विचारल्यावर मी म्हणालो की, भगवा तिरंग्यात आहे. आमचा विरोध भगव्याला नव्हे, भाजपला आहे. प्रा. डोळे म्हणाले की, भाजपच्या लोकांना प्रश्न विचारलेले आवडत नाही. जो प्रश्न विचारेल त्याची ते बदनामी करतात. निरंजन टकले यांनी पुस्तक लिखाणाचा प्रवास सांगितला. विवेक राठोड यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.