आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:असोलवाडी येथे 300 कोंबड्या दगावल्या, पशुसंवर्धन विभागाच्या पथकाकडून पाहणी; भोपाळ, पुणे येथे पाठविले नमुने

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी येथील एका तरुण शेतकऱ्याने उभारलेल्या कुकुटपालनातील ३०० कोंबड्या दगावल्याची घटना घडली असून शुक्रवारी ता. १२ पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने दुपारी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पाच कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ व पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.

कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी येथे लक्ष्मण गुहाडे या तरुणाकडे केवळ एक एकर शेत आहे. या शेतीला जोडधंदा म्हणून त्याने यावर्षीच शेतात कुकुटपालनाचा व्यवसाय सुरु केला. त्यासाठी त्याने कोंबडीचे चारशे पिल्ले हिंगोली येथून खरेदी केली. या कोंबड्यांना लसीकरण देखील केले. सध्या या कोंबड्या विक्री केल्या जाऊ लागल्या होत्या. सुमारे १०० कोंबड्यांची त्याने काही दिवसांपुर्वीच विक्री केली होती.

दरम्यान, आज सकाळी चार वाजता तो कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी शेड जवळ केला असता त्यामधील सर्वच कोंबड्या दगावल्याचे दिसून आले. याप्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते यांनी तेथे भेट दिली. या प्रकाराची माहिती पशुसंवर्धन विभागाला दिली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. माधव आठवले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच काही कोंबड्याचेे नमुने घेऊन तपासणीसाठी भोपाळ व पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. या अहवालानंतरच या कोंबड्या बर्डफ्लू मुळे दगावल्या का याची माहिती मिळणार असल्याचे डॉ. आठवले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...