आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या करिअरच्या संधी:जेमोलॉजीच्या पदवीधारकांना 30, 000 ते 1लाख वेतनाच्या संधी

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज ज्वेलरी अथवा दागिने घालणे हे फक्त महिलांच्या फॅशनपुरते मर्यादित राहिलेले नाही. पूर्वी ज्वेलरी फक्त महिला, कॉलेज तरुणीच वापरत होत्या. पण आता ५० टक्के महिला आणि ५० टक्के पुरुषदेखील ब्रास्लेट, रत्न अंगठी, डायमंड, साखळी आदी वापरतात. त्यामुळे या क्षेत्रातदेखील पारंपरिक अभ्यासक्रमांप्रमाणे चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

यात रोजगारासह स्वयंरोजगार, व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे ही संधी देवगिरी महाविद्यालयाने ज्वेलरी डिझायनिंग अँड जेमोलॉजी हा महाराष्ट्रातील पहिलाच पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमातून गेल्या पाच वर्षांत १६० हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे, तर महिन्याला अनुभव आणि कौशल्य विकासातून विद्यार्थ्यांना ३० ते १ लाखांपर्यंत वेतन मिळत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली.

विद्यापीठ अनुदान आयोगाचा बॅचलर ऑफ व्होकेशनल सायन्सअंतर्गत हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून त्याचे शुल्क १२००० रुपये आहे. यासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेश क्षमता ४० आहे. या अभ्यासक्रमात रत्नांची ओळख कशी करायची, त्याची निर्मिती, प्रकार, खरे-खोटे रत्न, कटिंग, पॉलिशिंग, गोल्ड कॅरेट कसे ओळखावे, भारतीय, पाश्चात्त्य, ऐतिहासिक ज्वेलरी, आदिवासी ज्वेलरी आदी प्रकार शिकवले जातात. यात गेल्या वर्षात १५ मुलांना पदवी अभ्यासक्रमानंतर नोकरी मिळाली आहे. त्यापैकी तीन विद्यार्थी स्वत:चा व्यवसाय करतात. या विद्यार्थ्यांची निवड स्वत: कंपनी महाविद्यालयात येऊन मुलाखतीद्वारे करते, असेही तेजनकर यांनी सांगितले.

एक ते तीन वर्षांचा अभ्यासक्रम
ज्वेलरी डिझायनिंग अँड जेमोलॉजी हा महाराष्ट्रातील पहिलाच पदवी अभ्यासक्रम औरंगाबादेतील तरुणांसाठी उपलब्ध करून दिला आहे. आता शहरातील विद्यार्थ्यांना मुंबई, दिल्लीला जाण्याची गरज नाही. हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असला तरी विद्यार्थी एक वर्ष प्रमाणपत्र, दोन वर्षांचा डिप्लोमा अथवा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रमही करू शकतात. यात रोजगारासह स्वयंरोजगार, व्यवसायाची संधी आहे. पदवी प्राप्त विद्यार्थी सध्या जयपूर, हैदराबाद, सुरत, कोलकाता, दुबई, तिरुवनंतपुरम येथे कार्यरत आहेत.
-डॉ. अशोक तेजनकर, प्राचार्य, देवगिरी महाविद्यालय

बातम्या आणखी आहेत...