आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री आज शहरात:शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 303 कोटी, तर पायाभूत सुविधांसाठी 330 कोटी मागणार

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूरची सभा आटाेपल्यानंतर शनिवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी (३१ जुलै) पहाटे पुन्हा औरंगाबादेत परतणार आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीय आमदारांंकडून देण्यात आली. रविवारी सकाळी १० वाजता विभागीय आयुक्तालयात आयाेजित बैठकीत ते मराठवाड्यातील नुकसानीचा व रखडलेल्या विकासकामांचा आढावा घेणार आहेत.जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत चार लाख ३८ हजार १२४ हेक्टर शेतीला फटका बसला. त्यामुळे ६ लाख २७ हजार ६१४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदतीसाठी ३०३ काेटी रुपयांची मागणी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. तर पावसामुळे जे रस्ते, पूल व इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले त्याची दुरुस्ती करण्यासाठी ३३० कोटी रुपयांची मागणीही करण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे आठ जिल्ह्यातील ३,७७३ पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. यात ५०९ किमीचे रस्ते, ४६० पूल आहेत. विभागीय आयुक्त मुख्यमंत्र्यांसमोर याबाबत सादरीकरण करतील. औरंगाबादच्या १९३ कोटींच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या विस्ताराबाबतच्या प्रस्तावाचाही यात समावेश आहे.

लोकांकडून मागण्यांचे कागद घ्यायचे आणि जवळ ठेवायचे हे मला अजिबात जमत नाही. आलेल्या कागदावर झटकन निर्णय घेऊन विषय संपवणे, हीच माझी कामाची पद्धत आहे. त्यामुळे यापुढे तुमची जी काही कामे असतील ती तातडीने मार्गी लागतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली. वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. पंचगंगा उद्योग समूहाच्या खासगी साखर कारखान्याच्या पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते. रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, वैजापूरची एमआयडीसी, शनिदेवगाव येथील प्रलंबित बंधारा आदी कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

गुवाहाटीत बोरनारे इतर आमदारांना धीर देत होते
आमदार बोरनारेंबद्दल शिंदे म्हणाले, ‘सुरुवातीपासून बाेरनारेंनी माझ्यावर विश्वास टाकला होता. टीव्हीवरील बातम्या पाहून सुरत आणि गुवाहाटीत असताना आमचे आमदार घाबरून जायचे. पण त्या वेळी बोरनारे आमच्या सोबतच्या आमदारांना धीर देत होते. विकासाचे प्रश्न व लोकांच्या हिताला प्राधान्य देणारा योग्य आमदार तुम्ही निवडला, अशी स्तुतीही त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...