आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्षांपासून मराठवाड्यात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह धो-धो पाऊस पडतोय. विशेषत: कमी वेळेत जास्त पाऊस व अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. नैसर्गिक आपत्तीत ३०४ जणांचा यात बळी गेले आहेत. यामध्ये वीज पडून १३०, पुरात वाहून १५३, भिंती पडून १६ आणि इतर आपत्तीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा गलथान कारभार आणि गावपातळीवर जनजागृतीचा अभाव असल्याने नैसर्गिक आपत्तीत कधी न भरून निघणारे नुकसान होत आहे.
मराठवाड्यात मागील दाेन वर्षांपासून वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मराठवाड्यात २०२० मध्ये ५५ जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. त्या तुलनेत गतवर्षी वीज बळींची संख्या ७५ झाली आहे. मागील आठवड्यात दाेनच दिवसांत ७ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. पुरात वाहून जाणाऱ्यांचे प्रमाणही विदारक असून दोन वर्षांत १०७ जण वाहून गेल्याची नोंद स्थानिक ते विभागीय, सरकारने घेतली आहे. याकडे गांभीर्याने पाहून यंदा नैसर्गिक आपत्तीतील बळींची संख्या व नुकसान कमी करण्यासाठी प्रशासनाने जनजागृती अभियान गावोगावी राबवणे गरजेचे झाले आहे.
जिल्हा वीज पडून पुरात वाहून भिंत पडून इतर आपत्ती एकूण
औरंगाबाद १३ २१ ०८ ०१ ४३
जालना १३ १६ ०४ ०० ३३
परभणी १२ ०८ ०१ ०१ २२
हिंगोली ०६ १८ ०० ०० २४
नांदेड ३५ ४१ ०० ०० ७६
बीड २३ २९ ०३ ०१ ५६
लातूर १८ ०९ ०० ०० २७
उस्मानाबाद १० ११ ०० ०२ २३
एकूण १३० १५३ १६ ०५ ३०४
जोरदार पावसामुळे वडवणीत पुलाचे नुकसान; दुचाकीसह चालक गेला वाहून, पण वाचला
वडवणी तालुक्यातील पुसरा येथे गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर आला. यात पुलावरील मुरूम वाहून गेला अन् खड्डा पडला. गुरुवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दुचाकीस्वार वाहून गेला. झाडाची फांदी पकडून राहिल्याने त्याचा जीव वाचला. हा पूल गेल्या वर्षीच वाहून गेला होता. ग्रामस्थांनी मुरूम टाकून तात्पुरता खड्डा बुजवला होता. पण वडवणीहून चिंचाळा गावाकडे हारुण सलीम कुरेशी (४२) दुचाकीसह (एमएच २२ जे ४१८५) वाहून गेले हेाते. सुदैवाने ते वाचले.
देगलूर तालुक्यात वीज पडून शेतकरी ठार
शेतात पेरणीसाठी गेलेल्या वन्नाळी (ता.देगलूर) येथील एका शेतकऱ्याचा लखा शिवारात वीज पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (१८ जून) सायंकाळी ६ वाजता घडली. विठ्ठल शंकराव भाले (४१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. देगलूर शहर व ग्रामीण भागात शनिवार सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पेरणीचे साहित्य व औषधी झाकण्यासाठी भाले गेले असता अंगावर वीज पडली.
यंत्रणा गतिमान करण्याची गरज
नैसर्गिक आपत्तीची माहिती वेळेत पोहोचवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय ग्रामसेवक, कृषी सेवक, तलाठी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डेटा एंट्री ऑपरेटर यांची वेळोवेळी मदत घेण्याचे निर्देश केंद्र व राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, ही यंत्रणा अतिशय संथ गतीने काम करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.