आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवन’:कायम फिट राहा सांगणारे 33 वर्षांचे प्राध्यापक देऊन गेले चौघांना ‘जीवन’ ; औरंगाबादने केली अवयव देण्यात मदत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 जानेवारी २०१६ पासून २७ वेळा

आरोग्य हेच जीवन आहे. त्यामुळे हेल्दी राहा, कायम फिट राहा’ असे विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत मग नेटवर्क थिअरी विषय उलगडून सांगणारे ३३ वर्षांचे प्रा. सुहास सुखदेव गायके १ जून रोजी दुपारी वर्गात शिकवत असतानाच मेंदूत रक्तस्रावाने कोसळले. त्यांना तातडीने ओरियन सिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, २ जून रोजी ते ब्रेन डेड झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयानुसार शनिवारी (४ जून) अवयवदान करण्यात आले. हृदय मुंबईत, यकृत पुण्यात तर दोन्ही किडन्या आणि डोळे औरंगाबादेत गरजूंना देण्यात आले. त्यामुळे चार जणांना नवे जीवन मिळाले. कोरोनानंतर हे औरंगाबादेतील पहिलेच मोठे अवयव प्रत्यारोपण होते. औरंगाबादमध्ये १५ जानेवारी २०१६ रोजी पहिले प्रत्यारोपण झाले. तेव्हापासून २७ वेळा औरंगाबादने अवयवदानात मदत केली. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत गायके ब्रेन डेड झाल्यानंतर ओरियन सिटी केअरचे डॉ. पांडुरंग वट्टमवार यांनी गायकेंची पत्नी विजया आणि भाऊ डॉ. शुभम यांच्याशी चर्चा करत त्यांचे समुपदेशन केले. देवगिरी अभियांत्रिकीचे प्राचार्य उल्हास शिऊरकर यांनी सांगितले की, गायकेंना महाविद्यालयातच त्रास झाला होता. त्यांच्या तोंडाला फेस आला होता.

कुटुंबाशी चर्चा करून निर्णय डॉ. वट्टमवार यांनी सांगितले की, कोरोनामुळे अवयवदान प्रक्रिया थांबली होती. मात्र आता सुरू झाली आहे. गायकेंची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांचे हृदय मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटल, यकृत पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलला विमानाने पाठवले. औरंगाबादेतील बजाज, सिग्मा हॉस्पिटलला किडनी देण्यात आली. बजाज हॉस्पिटलला दोन्ही डोळे पाठवले आहेत.

पत्नी, भावाची महत्त्वाची भूमिका सुहास गायके यांची पत्नी विजया, भाऊ डॉ. शुभम तसेच आई-वडिलांनी अवयवदानात महत्त्वाची भूमिका बजावली. शुभम गायके पुण्यात डॉक्टर आहेत. सुहास यांची बहीणही डॉक्टर आहे. त्यामुळे त्यांनी पटकन परिस्थिती समजून घेतली, असे वट्टमवार म्हणाले. डॉ. शुभम यांनी सांगितले की, सर्व कुटुंबीयांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. अवयवदानातून चार जणांना जीवनदान मिळेल, हे महत्त्वाचे.

सकाळी नऊ वाजता सुरू झालेली प्रक्रिया दुपारी दोन वाजेपर्यंत चालली. या वेळी पोलिसांचा बंदोबस्त होता. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. पांडुरंग वट्टमवार, डॉ. आशिष देशपांडे, डॉ. वीरेंद्र वडगावकर, डॉ. योगेश देवगिरीकर, डॉ. योगेश वरगंटवार यांनी यशस्वी केली.

बातम्या आणखी आहेत...