आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रावणाच्या पहिल्याच सोमवारी (१ ऑगस्ट) ३५ हजार भाविकांनी ग्रामदैवत खडकेश्वराला नमन केले. आयुष्यात सुख-समृद्धी नांदू दे म्हणत साकडेही घातले. दिवसभरात ११ अभिषेक झाले, तर दानरूपात धान्याची आरास भक्तांनी मंदिरात लावली. “ओम नम: शिवाय’च्या गजरात मंदिराचा परिसर फुलला होता. कोरोनाचे सावट निवळल्यानंतर पहिल्यांदाच उत्सव साजरा होत असल्याचे चैतन्य पाहायला मिळाले.
शहरातील साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वीच्या खडकेश्वर महादेव मंदिरात भक्तांची मांदियाळी बघायला मिळाली. पहाटे चार वाजता मंदिर उघडण्यात आले. यानंतर साडेचार वाजेच्या सुमारास भाविकांच्या हस्ते अभिषेक, आरती करण्यात आली. सकाळपासून भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली हाेती. विशेषत: तरुणाईची गर्दी लक्ष वेधणारी होती. यानंतर सायंकाळी ५ वाजता लघु रुद्राभिषेक करून महादेवाला शृंगार करून मुकुंद मांगोळकर यांच्या हस्ते महापूजा आणि आरती करण्यात आली. भक्तगण जय भोलेनाथ, हर हर महादेव असा जयघोष करत हाेते.
नैवेद्यासाठी मंदिरात मिठाईचे स्टॉल्स
खडकेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात महादेवाच्या पिंडीवर वाहण्यासाठी लागणारे बेलपत्र, पान, फुले यासाठी विविध फुलांची दुकाने लावण्यात आली होती. यासोबतच मिठाई, कटलरी साहित्य विक्री करणारी दुकानेसुद्धा होती. यासोबतच उल्कानगरी, सेव्हन हिल्स परिसरातील बेलेश्वर महादेव मंदिर, सिडको एन-५ येथील मंदिरासह पिसादेवी महादेव मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
सोमवारी ३ मंदिरांत रक्तदान शिबिर
माहेश्वरी मंडळ ज्योतीनगर व लायन्स ब्लड बँकेतर्फे खडकेश्वर मंदिरातील शिबिरात २३ जणांनी रक्तदान केले. उल्कानगरी येथील ओंकारेश्वर मंदिरात १५ जणांनी, ज्योतीनगर काशी विश्वेश्वर मंदिरात २० जणांनी रक्तदान केले. या वेळी लायन्स ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी वैभव बदर, डॉ. विद्या घोडके, मोहंमद जाकीर यांनी काम पाहिले. प्रत्येक साेमवारी रक्तदान शिबिर घेण्यात येईल, अशी माहिती रक्तपेढीचे मनोज चव्हाण यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.