आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रथयात्रा:कर्णपुऱ्यात 250 वर्षांपूर्वीच्या सागवानी रथातून उद्या बालाजीची रथयात्रा, 350भाविक ओढणार

गिरीश काळेकर । औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रासह विजयादशमीला कर्णपुरा देवीच्या दर्शनाला जशी गर्दी जमते, त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी दसऱ्याला त्याच्या शेजारीच असलेल्या बालाजी मंदिरातील रथयात्रेलाही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. तब्बल २५० वर्षांपूर्वीच्या रथातून बालाजीची यात्रा निघते. ३० वर्षांपूर्वी २० हजार खर्च करून विश्वस्तांनी या लाकडी रथाची चाके काढून ट्रकची चाके आणि ब्रेक लावले होते. त्याचाच अजूनही वापर होतोय. मात्र दरवर्षी पाच हजार रुपये डागडुजीला खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शहागंज येथील बालाजी मंदिरातूनही रथयात्रा निघते. या मिरवणुकीस ५० वर्षांपासूनची परंपरा आहे. मात्र पूर्वी लाकडी रथ होता, गेल्या १० वर्षांपासून स्टीलच्या रथातून येथील मिरवणूक रात्री ७ वाजता निघते.

कर्णपुऱ्यात विजया दशमीनिमित्त गुरुवारी पहाटे ३ वाजता महापूजा होईल. यानंतर सकाळी ७ वाजता महाआरती होऊन घट हलवले जातील. यानंतर सायंकाळी ७ वाजता बालाजीची मूर्ती रथात बसवून सीमोल्लंघनासाठी नेली जाईल. पंचवटी चौकापर्यंत जाऊन रथ परत फिरतो. रात्री ११ वाजेपर्यंत पुन्हा मंदिरात परत येतो. रथ ओढण्यासाठी एका वेळी ३०० ते ५०० भाविक असतात. पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांच्यासह संतोष बारवाल, संतोष मरमठ यांच्या उपस्थितीत रथयात्रेला सुरुवात होईल. मिरवणुकीत विडा, रेवड्यांची उधळण केली जाते.

राजाबाजारमधूनही निघणार मिरवणूक : राजाबाजार येथील बालाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने सकाळी ९ वा. मिरवणूक काढण्यात येणार आहे. या वेळी रथात बालाजीची मूर्ती, राम, सीता, लक्ष्मणाचा फोटो ठेवून बँडपथकासह मिरवणूक निघेल. किराणा चावडी, दिवाण देवडी, रंगारगल्ली, मछली खडक, पानदरिबा, अग्रसेन भवन, गांधी पुतळामार्गे मंदिरापर्यंत येऊन समारोप होईल. मंदिराचे ट्रस्टी भिकचंद चिचाणी, माजी खासदार चंद्रकांत खैरे, मानसिंग पवार, माजी महापौर नंदू घोडेले, प्रफुल्ल मालाणी उपस्थित राहतील. सकाळी ११ वा. आरती होईल व दुधाचा प्रसाद वाटप केला जाणार असल्याचे प्रफुल्ल मालाणी यांनी सांगितले.

३० फुटांचे पार्किंग शेड, कुमावत समाज करतो डागडुजी
कर्णपुऱ्यातील बालाजीचा रथ पार्क करण्यासाठी दानवे कुटुंबाने ३० बाय २० फूट लांब आणि रुंद तसेच ३० फूट उंच पार्किंग शेड उभारला आहे. तेव्हापासून हा रथ वर्षभरातील इतर दिवस येथील पार्किंगमध्ये असतो. अस्सल सागवानी लाकडाचा हा रथ अडीचशे वर्षांपूर्वी राजा करणसिंग यांनीच बनवून घेतला होता. लाकडी चाकांमुळे रथ ओढण्याला आणि थांबवण्यासाठी प्रचंड मेहनत, कसरत करावी लागत होती. त्यामुळे ३० वर्षांपूर्वी याला ट्रकची चाके आणि ब्रेक बसवून घेतल्याचे राजेंद्र पुजारी यांनी सांगितले. याशिवाय दरवर्षी कुमावत समाजाच्या वतीने रथाची डागडुजी केली जाते. यामध्ये रंगरंगोटीही केली जाते.

बातम्या आणखी आहेत...