आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध संकलन:खासगी संस्थांमुळे जिल्हा संघाचे 36509 लि. दूध संकलन घटले

संतोष देशमुख | औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडे २०१७-१८ मध्ये १ लाख ५ हजार ३० लिटर दूध संकलन होत होते. २०२२ मार्चअखेरपर्यंत ते ६८ हजार ५२१ लिटरपर्यंत खाली आहे. गेल्या चार वर्षांत ३६ हजार ५०९ लिटर्स दूध खासगी दूध संस्थांनी दरवाढ करून पळवण्यात यश मिळवले आहे. यामुळे फायद्यात असलेला मराठवाड्यातील एकमेव दूध संघ संकटात सापडला आहे.

चार वर्षांपूर्वी आवक वाढल्याने गांधेली येथे दहा एकर जागेत केंद्र सरकारच्या योजनेतून दुग्ध प्रकल्प, बनशेंद्रा, पाथ्री, पैठण, वैजापूर येथे दूध शीतकरण केंद्र सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांना गायी व म्हशी देण्यात आल्या. पशू आहार, कृत्रिम रेतन सेवा उपलब्ध करून दिली. ४१५ दूध विक्री केंद्रे स्थापन केली. मात्र, गत चार वर्षांत स्पर्धा वाढली आहे. औरंगाबाद, महाराष्ट्र, परराज्यातील नामवंत दूध संस्थांची साखळी गावपातळीवर पोहोचली. २ रुपये जास्त भाव देण्यात आल्याने संघाचे दूध संकलन दरवर्षी खालावत आहे. आत संकलन कमिशन वाढवणे आणि दूध नासणे, फॅटवरून दूध नाकारणे आदींमध्ये सुधारणा करावी लागेल. अवाजवी खर्च टाळावा लागेल, असे वार्षिक सभा व अहवालातून स्पष्ट होते.

दुग्धजन्य पदार्थ विक्रीत वाढ दूध संकलनात ३६५०९ लिटर्सने प्रतिदिन घट झाली असली तरी पनीर, आइस्क्रीम, दही, ताक, तूप, पेढे, खवा उत्पादन, विक्रीत वाढ होऊन गत चार वर्षांच्या तुलनेत सरासरी ३०८.३ लाखांनी उत्पन्न वाढल्याचे वार्षिक अहवालात म्हटले आहे. आता केंद्र शासनाचे क्वालिटी मार्क चिन्ह घेण्यासाठी संघाचे प्रयत्न सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...