आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दारुची मागणी:हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवसांत 37 हजार लिटर दारुची विक्री

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशीदारुची मागणी वाढली, मद्य सम्राटांकडून लॉबींगचा प्रयत्न

हिंगोली जिल्ह्यात लॉकडाऊन नंतर सुरु झालेल्या मद्यविक्रीच्या दुकानांवर चांगलीच गर्दी होत असून शनिवारी (16 मे) तब्बल 37 हजार लिटरची दारु विक्री झाली आहे. यामध्ये 28 हजार लिटर देशीदारुचा समावेश आहे. तर हिंगोलीतील काही तथाकथीत मद्यसम्राटांकडून उत्पादन शुल्क विभागाला हाताशी धरून लॉबींगचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

हिंगोली जिल्हयात देशीदारु विक्रीची 42 दुकाने असून विदेशी दारु विक्रीची 4 दुकान आहेत. या शिवाय 40 बिअर शॉपीची दुकाने आहेत. या शिवाय देशीदारुची ठोक विक्री करणारी 3 तर विदेशी दारुची ठोक विक्री करणारे 1 दुकान आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी लागू झाल्यानंतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार हि दुकाने बंद होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यात धुळफेक करून चोरीछुपे दारु विक्री सुरु होती. मात्र  पोलिस विभागाने बेकायदेशीर दारु विक्रीच्या ठिकाणी छापे टाकले आहेत. पोलिसांनी तब्बल 214 ठिकाणी छापे टाकले असून त्या ठिकाणावरून देशी, विदेशी व गावठी दारु जप्त केली आहेत. यामध्ये 20 वाहने देखील जप्त केली आहेत.

दरम्यान, प्रशासनाने काही अटींवर मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्याचे आदेश दिले. यामध्ये परवानाधारकांनाच मद्यविक्री करावी, सामाजिक अंतर पाळावे, दिलेल्या वेळेतच दुकान सुरु ठेवावेे या सुचनांचा समावेश होता. त्यानुसार गुरुवारी (14 मे) दुकाने सुरु झाली, मात्र पहिल्या दिवशी गर्दी झालीच नाही. तर शनिवारी (16 मे) दुकानांवरून गर्दी झाली. हिंगोली शहरात गर्दी नियंत्रीत करणे कठीण झाल्याने एक दुकान बंद करावे  लागले आहे. या एकाच दिवसात 37 हजार लिटरची दारु विक्री झाली आहे. यामध्ये 28 हजार लिटर देशीदारुचा समावेश असून 1200 लिटर विदेशी दारु तर 8 हजार लिटर बीअरचा समावेश आहे.

तथाकथीत मद्यसम्राटांचा लॉबींगचा प्रयत्न

हिंगोली शहरात मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यामध्ये तथाकथीत मद्यसम्राटांकडून लॉबींग करून कंटोनमेंट झोनचे कारण दाखवून कागदीघोडे नाचविण्याचा प्रयत्न झाला. त्यात काही दुकाने सुरु तर काही दुकाने बंद ठेवण्याबाबत आदेश काढण्याची गळ घातली जाऊ लागली होती. मात्र उत्पादन शुल्क विभागाकडून तसेच जिल्हा प्रशासनाकडून त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

आता दुकानांमधील साठा तपासणीची गरज

संचारबंदीच्या काळात दुकाने बंद असतांना दुकानातील असलेला मद्याचा साठा तसेच आता दुकाने उघडल्यानंतर असलेला मद्याचा साठा तपासण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. त्यावर आता उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी केली जाणार असल्याचे कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...