आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघे अटकेत:2 कंटेनरमधील 30 लाखांचे 38 हजार लिटर बायोडिझेल जप्त; औरंगाबाद पोलिसांची कारवाई

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थानिक गुन्हे शाखा, करमाड पोलिसांची कारवाई, दोघे अटकेत

बिडकीनमधून बेकायदेशीररीत्या बायोडिझेल जालना येथे घेऊन जाणाऱ्या दोन कंटेनरवर कारवाई करत १ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि करमाड पोलिसांनी ३० लाख ४० हजारांचे ३८ हजार लिटर बायोडिझेल जप्त केले.

दोन कंटेनर जालना येथे जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय जाधव यांना मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा आणि करमाड पोलिस कारवाईसाठी पिंप्री ते कचनेर रोडने जात असताना १ मार्च रोजी दुपारी २ वाजता रोडवरील हॉटेल राजपूतच्या पुढे पोलिसांना हुसेनपूर शिवारात दोन कंटेनर येताना दिसले.

पोलिसांनी त्यांना थांबवून कंटेनरची (एमएच ४६ बीएम ८९७९) आणि (एमएच २३ एयू १५१९) पाहणी केली. या वेळी कंटेनरमध्ये राहुल लक्ष्मण बोराडे (२४, रा. धामणगाव), शरद सूर्यभान खेडकर (२५, रा. बोरगाव) आढळून आले. या वेळी पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी बायोडिझेल असून ते जालना येथे विकण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचांसमक्ष पाहणी केली असता कंटेनरमध्ये ३० लाख ४० हजार रुपये किमतीचे ३८ हजार लिटर बायोडिझेल आढळून आले. पोलिसांनी साठा व दोन्ही कंटेनर जप्त करत ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बोकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय जाधव, श्रीमंत भालेराव, विठ्ठल राख, बालू पाथ्रीकर, आनंद घाटेश्वर, करमाड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार बाबाराव होळंबे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...