आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:43 वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला जिवंत दाखवून हडपली 4 हेक्टर जमीन

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिलीभगत वरखेडी खुर्द येथील घटना, दुय्यम निबंधकासह तिघांवर गुन्हा दाखल

साधारण ४३ वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यामधील भोकरदन तालुक्यातील जानकीराम आबाजी औटी यांचे निधन झाले होते. त्यांची साेयगाव तालुक्यातील वरखेडी खुर्द गावातील जमीन संरक्षित कुळ म्हणून डोभाळ नावाच्या कुटुंबाला १९६० मध्ये देण्यात आली. सोयगावच्या निबंधक कार्यालयात मात्र तब्बल ४३ वर्षांनंतर निधन झालेल्या औटी यांना कागदोपत्री जिवंत दाखवून डोभाळ कुटुंबाची ४ हेक्टर ४९ आर इतकी जमीन परस्पर नावावर करून विकण्याचा प्रयत्न झाला आहे. लॉकडाऊनमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी सह्या टाळून हा घोटाळा करण्याचा प्रयत्न झाला. सोयगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी पदमसिंग हिरासिंग राजपूत, दुय्यम निबंधक नरवडे यांच्यासह तोतया व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरखेडी खुर्द येथील दुलचंद बालचंद डोभाळ (५९) यांना १९६० पासून कुळात मिळालेली ही जमीन आहे. त्याचे पिकपेरे त्यांच्या वडिलांच्या नावावर आहेत. १९ डिसेंबर २०२० रोजी ते जमिनीचा सातबारा काढण्यासाठी सेतू कार्यालयात गेले. तेव्हा त्यांच्या जमिनीचा फेरक्रमांक बदलला गेल्याचे व पदमसिंग हिरासिंग राजपूत नावाच्या व्यक्तीच्या नावे ही जमीन झाल्याचे दाखवण्यात आले. हा प्रकार पाहून डोभाळ यांना धक्काच बसला. सोयगावच्या तहसीलमध्ये चौकशी केली असता २९ मे २०२० रोजीच या जमिनीचे खरेदीखत झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यात जानकीराम आबाजी औटीऐवजी जानकीराम आबाजी आम्टे (७२, बिडकीन) असे नाव टाकून ही जमीन २२ लाख रुपयांमध्ये राजपूतच्या नावावर केल्याचा उल्लेख आढळला. मूळ कागदपत्रांनुसार भोकरदन तालुक्यातील जानकीराम औटी यांची ही जमीन होती व ते दुलचंद डोभाळ यांच्या वडिलांचे मित्र होते. औटी यांनी ही जमीन डोभाळ यांना कुळात दिली होती. त्यानुसार जमिनीच्या मूळ कागदपत्रावर व सातबाऱ्यावरही औटी यांचेच नाव होते. या मूळ कागदपत्रांवरून बनावट कागदपत्रे तयार करून औटी यांच्या नावाने राजपूत याने अधिकाऱ्यांना हाताशी धरून तोतया व्यक्ती उभी केली व डोभाळ यांची जमीन परस्पर हडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डोभाळ यांनी सोयगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून राजपूतसह तत्कालीन दुय्यम निबंधक नरवडे व तोतया व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अडचणीत सापडू म्हणून महत्त्वाच्या सह्या टाळल्या
औटी यांनी डोभाळ कुटुंबाच्या नावावर जमीन करून दिली होती. त्यानंतर जुलै १९७७ मध्ये त्यांचे निधन झाले. तर दुलचंद यांच्या वडिलांचे १९९७ मध्ये निधन झाले. तरीही आरोपींनी २०२० मध्ये औटी यांच्या आडनावातील शेवटच्या शब्दात बदल करून औटी ऐवजी आम्टे असे नाव टाकून ही जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे खरेदीखतावर डोभाळ यांचा फोटो नसून दुसऱ्याचाच फोटो लावण्यात आला आहे. तर, जमीन लिहून देणाऱ्याची म्हणजेच आम्टे यांची खरेदी खतावर व फॉर्म क्र.६१ वर सहीही नाही. प्रतिज्ञापत्रावरही सही न करताच निबंधक कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली. दस्त गोषवाराच्या भाग दोन कागदपत्रांवर तर जानकीराम आबाजी एवढेच नाव असून तेेथे आडनाव औटी हे नाव टाळले आहे. १ लाख ९० हजारांच्या व्यवहाराच्या पुढे पॅन कार्ड बंधनकारक असताना त्याचीही अधिकाऱ्यांनी शहानिशा केलेली नाही.

कडक लॉकडाऊनमध्ये प्रक्रिया, आरोपी फरार
२९ मे २०२० रोजी या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. कोरोनामुळे मे महिन्यामध्ये सर्वत्र कडक लॉकडाऊन होता. त्या वेळी आरोपींनी बनावट कागदपत्रे, चालान, तोतया व्यक्ती उभ्या करून अधिकाऱ्यांच्या मदतीने हा प्रकार केला. तक्रारदार दुलचंद यांना तब्बल चार दिवस साेयगाव पोलिसांनी ठाण्यात चकरा मारायला लावल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांनी आरोपींवर कारवाई केलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...