आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. चौथी लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यावर वेळीच मात करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने औरंगाबाद पालिकेला सतर्कतेचा इशारा देत तपासण्या वाढवण्याची सूचना केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनपा आरोग्य विभाग मंगळवारपासून (7 जून) आणखी 9 तपासणी केंद्रावर कोरोना टेस्ट सुरू करणार आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
आज आढळले दोन रुग्ण
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेने औरंगाबादेत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी राज्यासह केंद्र सरकारनेही औरंगाबादेतील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येवरून चिंता व्यक्त केली होती. केंद्र व राज्य सरकारच्या विशेष पथकांनी औरंगाबादेत पाहणी करत विविध उपाययोजना राबवण्याची सूचना केल्यानंतर प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे वाढती रुग्णसंख्या अटोक्यात आली. तिसर्या लाटेने राज्यभरात कमी नुकसान झाले. मात्र आता चौथी लाट जूनअखेर येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने औरंगाबादसह राज्यातील जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, औरंगाबाद शहरात रविवारी दोन रुग्ण आढळले.
नागरिकांनी मास्क वापरावे
उदय कॉलनी समर्थनगर, हर्सूल कारागृहातील एका कैद्याला कोरोनाची लागण झाली आहे. तथापि, शहरात कोरोनाचे संक्रमण फारसे दिसून येत नाही. यापूर्वी कोरोनाच्या लाटा आल्या, तशी चौथी लाट राहणार नाही. मात्र, जून अखेरीस रुग्णसंख्या निश्चित वाढेल, असे डॉ. पारस मंडलेचा यांनी नमूद केले. सध्या शहरात सहा ठिकाणी कोरोना तपासणी केली जाते. बहुतांश नागरिक तपासणी करून घेण्यास नकार देतात. ज्यांना ताप आहे, विदेशात जायचे असेल तेच तपासणी करून घेतात. सक्ती नसली तरी नागरिकांनी वैयक्तिक हितासाठी तरी मास्क लावायला हवा. शासन निर्देशानुसार 9 नवीन तपासणी केंद्र मंगळवारपासून सुरू होणार आहे, असेही डॉ. पारस मंडलेचा यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.