आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर(मसिआ)च्या वतीने आयोजित अॅडव्हांटेज एक्स्पोमध्ये तिसऱ्या दिवशी ३५ हजार ७६१ जणांनी हजेरी लावली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रदर्शनात आजपर्यंत ७८ हजार ७११ जणांनी हजेरी लावली. ताशी चार हजार लोक प्रदर्शनाला येत होते. यात तरुण आणि विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून त्यांनी स्वयंरोजगाराचे कौशल्य, रोजगाराच्या संधी, आर्थिक व्यवस्थापन, संरक्षण मंत्रालय आणि रेल्वेतील उद्योगांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. ६३० कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत.
उद्योग क्षेत्राचे खरे प्रतिबिंब येथे पाहायला मिळते. उद्योगांच्या उत्पादनांची माहिती व उद्योगांना आवश्यक कौशल्याचे मनुष्यबळ यांच्यातील संवादाचा सेतू या प्रदर्शनाने साधला आहे. तंत्रशिक्षण शाखेचे विद्यार्थी येथे हजारोंच्या संख्येने येत आहेत. अत्याधुनिक फर्निचरपासून घरांच्या डिझाइन्सपर्यंत सामान्यांच्या गरजेचेही अनेक स्टॉल्स आहेत. महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटीची माहिती देणारा स्टॉल उभारण्यात आला आहे. यावर आतारपर्यंत ५ हजार नागरिकांनी भेट दिली. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक संधी : उद्योग जगताला मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज असल्याने आयटीआय, पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी असल्याचे मत जिल्हा उद्योग केंद्रातील मॉडेल करिअर सेंटरचे समन्वयक डॉ.अनिल जाधव यांनी व्यक्त केले. एक्स्पोमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या करिअर मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी शासनाच्या कौशल्य विकास योजनांचीही माहिती दिली. आयटीआयचे उपसंचालक डी.बी.दंडे, इन्स्ट्रक्टर मनोज कांबळे उपस्थित होते.
विनामूल्य अभ्यासक्रमांचा उपयोग करा : डिजिटल इंडियामुळे सायबर क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण झाल्याची माहिती देत सी, सी प्लस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री ४.०, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, पायथॉन आदी मोफत संकेतस्थळांची, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विनामूल्य शॉर्ट टर्म अभ्यासक्रमांची माहिती या वेळी देण्यात आली.”आयटीआय व इंजिनिअरिंगमधील आधुनिक अभ्यासक्रम’ या विषयावर तंत्रशिक्षण सहसंचालक प्रा.सतीश सूर्यवंशी, छत्रपती शाहू महाराज महाविद्यालयाचे प्रा.डॉ.उल्हास शिंदे, शासकीय अभियांत्रिकीच्या डॉ.भालचंद्र आणि बजाज ऑटोच्या टीपीएम युनिव्हर्सिटीचे प्रमुख जयंत यावलकर यांनी मार्गदर्शन केले. दीड हजाराहून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले होते. अर्जुन गायकवाड आणि के. रविशंकर यांनी हा संवाद साधला.
योग्य उमेदवाराअभावी दीड हजार जागा रिक्त : लोक म्हणतात रोजगार मिळत नाही, केवळ काम करण्याची मानसिकता नसल्याने लोक बेरोजगार राहत आहेत. आजघडीला औरंगाबादमधील औद्योगिक जगतात दीड हजारावर जागा केवळ योग्य उमेदवार मिळत नसल्याने रिक्त आहेत. कुशल कामगारांना सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे आपण मिळवत असलेले प्रशिक्षण उत्तम प्रकारे घेऊन जबाबदार नागरिक बना व आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करा. वारंवार अपडेट होणे, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे तुमच्याच प्रगतीसाठी फायदेशीर राहील, असे मार्गदर्शन मसिआच्या सॉफ्ट स्किल ट्रेनिंग विभागाचे प्रमुख सलील पेंडसे यांनी केले.
रेल्वे विभागाच्या वतीने नितेश मुळे यांचे व्याख्यान झाले. यामध्ये त्यांनी रेल्वेचे प्रकल्प मिळवण्यासाठीची प्रक्रिया कशी राबवावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. २०० कोटींपेक्षा कमी रकमेचे प्रकल्पांचे टेंडरिंग कसे करावे, याबद्दल त्यांनी सांगितले. यामध्ये सूक्ष्म आणि लघुउद्योगांना २५ टक्के, एसएसटी वर्गाला ४ टक्के तर महिला उद्योजकांना ३ टक्के सूट मिळते, असे ते म्हणाले.
ऑनलाइन नोंदणी ठप्प
एक्सपोच्या तिसऱ्या दिवशी येथे तब्बल ३५,७६१ अभ्यागतांनी भेटी दिल्या. एक्स्पोस्थळी इंटरनेट विखंडित झाल्याने अनेकांना क्यूआर कोड स्कॅन करता आला नाही. अशा ६,९४७ नागरिकांना थेट पास देऊन त्यांची नोंदणी करण्यात आली. तीन दिवसांत ७८ हजार लोकांनी येथे भेट दिली असून यात विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. शनिवारी सिटी बसेसची संख्या व फेऱ्या कमी पडत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
परदेशी उद्योजकांनी भेट देऊन केली पाहणी
जर्मनीतील उद्योगांशी थेट जोडून उद्योग व्यवहार सुरू करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या गेरहार्ड प्रोट्झे आणि इरिस बेकर यांनी एक्स्पोला भेट दिली. आतापर्यंत किर्दक ऑटोमोटिव्ह, केसीपी, शुभनील इंडस्ट्रीज, विजय गिअर्स या उद्योजकांना त्यांनी थेट जर्मनीच्या उद्योजकांशी जोडल्याने त्यांना जर्मनी येथून ऑर्डर मिळतात. यात नव्याने साधारण ११ उद्योगांचा समावेश होण्याची शक्यता उद्योजक सुनील किर्दक यांनी वर्तवली आहे.
प्रदर्शनात आजचे कार्यक्रम
सेल्फ मेड औरंगाबाद जायंट्स - अजित सीड्सचे पद्माकर मुळे, मॅट्रिक्स लाइफ सायन्सेसचे कुणाल सिकची, बडवे ग्रुपचे श्रीकांत बडवे, एअरॉक्सचे टेक्नॉलॉजीजचे संजय जैस्वाल आणि ब्रह्म प्रिसीशनचे भावुक त्रिपाठी यशाचा प्रवास उलगडतील. प्रसिद्ध उद्योजक आणि ग्लोेबल एक्स्पर्टचे संचालक मुकुंद कुलकर्णी त्यांच्याशी संवाद साधतील. इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री- करंट अँड फ्यूचर अँड इफेक्ट ऑन इंडियन ऑटोमोबाइल इंडस्ट्री’ या विषयावर मर्सिडीज बेन्झचे इंडिया हेड व्यंकटेश कुलकर्णी विचार मांडतील.
सिटी बसेसची कमतरता आणि वाहतूक कोंडीचा त्रास
सायंकाळी सहा वाजेनंतर परतीच्या दिशेने निघालेल्या वाहनांची कोंडी झाली. अवघे १०० मीटर अंतर कापण्यासाठी २० मिनिटे लागत हाेती. उल्लेखनीय बाब म्हणजे येवढ्या मोठ्या एक्स्पोच्या ठिकाणी असणाऱ्या मार्गावर पहिल्या दिवशी प्रमाणे दर दिवशी वाहतूक शाखेचे पोलिस असणे अपेक्षित होते. मात्र, पोलिस नसल्याने ही कोंडी झाली. ही कोंडी शेंद्रा प्रवेशद्वारच्या बाजूने जशी होती तशीच औरंगाबाद व करमाडच्या दिशेनेसुद्धा होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.