आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्षांनंतर कोरोनाचे संकट हटले आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवे वाहन, सोने आणि घर खरेदीसाठी उत्साह वाढला. औरंगाबादमध्ये ५०० घरांची नोंदणी झाली. शनिवारी २५० कुटुंबे स्वत:च्या घरात प्रवेश करतील. ४० ते ४५ किलो सोने विक्रीची शक्यता आहे. ४५०० जण कार खरेदी करत आहेत.
सोने- २५ ते ३० कोटी रुपयांच्या उलाढालीची शक्यता
आैरंगाबाद-गुढीपाडव्याच्या दिवशी जिल्ह्यात ४० ते ४५ किलो म्हणजेच २५ ते ३० कोटींची उलाढाल होऊ शकेल, असे औरंगाबाद जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले. सध्या बँकेचे व्याजदर कमी होत आहेत. मात्र, सोन्याचे भाव वाढतच आहेत. २०१२ मध्ये सोने ३१ हजार रुपये तोळा होते. दहा वर्षांनंतर २०२२ मध्ये ५२ हजार ७०० रुपये तोळा असा भाव झाला आहे. २०३२मध्ये सोनेे ६५ हजार होण्याची शक्यता आहे, असे सोने-चांदी व्यापाऱ्यांनी सांगितले.
लग्नसराईमुळे
कोरोनाचे संकट हटले आहे. गुंतवणूक महत्त्वाची आहेच. शिवाय निर्बंधमुक्तीमुळे धडाक्यात विवाह सोहळे होतील. एकुणात लग्नसराईमुळे उत्साहाचे वातावरण आहे. वधू-वरांकडील मंडळी मंगळसूत्र, पाटल्या, बांगड्या, नाणी खरेदी करत आहेत.
घर - १००० भूखंड, ५०० फ्लॅट बुक, २५० जणांचा गृहप्रवेश
औरंरागाबाद शहर आणि परिसरातील गृहप्रकल्पांमध्ये सुमारे ५०० जणांनी सदनिकांची बुकिंग गेल्या दोन दिवसांत झाली. त्यातील २५० जण शनिवारी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून स्वत:च्या घरात राहण्यास जात आहेत. क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष (इलेक्ट) प्रमोद खैरनार, क्रेडाई ड्रीम होम प्रदर्शनाचे समन्वयक संग्राम पटारे आणि औरंगाबाद क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी घरांचा दर १५०० ते २५०० रुपये प्रति चौरस फूट होता. तो आता ४५०० ते ६००० रुपये झाला आहे.
फायदाच फायदा
मोक्याच्या जागेवरील सुमारे १००० भूखंडांची खरेदी झाली आहे. दहा वर्षांनंतर सदनिकांचा दर आठ ते नऊ हजार रुपये चौरस फूट असू शकतो. हा सर्वात मोठा परतावा आहे. यात कोणतीही जोखीम नसल्याने कोरोनानंतर नवे घर, प्लॉट खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे.
वाहन- ३०० महागड्या जीप, कारची खरेदी होणार
औरंगाबाद | कोरोना संकटामुळे तरुणाईच्या मानसिकतेत बदल होत आहे. कुटुंबासाठी वाहन खरेदीसोबत तरुण मंडळी हौसमौज, रेसिंगसाठी जीप, स्पोर्ट्स कार, एसयूव्ही खरेदी करत आहेत. शनिवारी सुमारे ४५०० घरांसमोर नवी चारचाकी उभी असेल. त्यापैकी किमान ३०० महागड्या जीप, कार असतील. रत्नप्रभा मोटर्सचे व्यवस्थापक नाझीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंददायी ड्रायव्हिंगकडे कल वाढला आहे. त्यामुळे इंधन दरवाढीची झळ सोसूनही वाहन खरेदी होत आहे.
ईव्हीला मागणी
इलेक्ट्रिक, सीएनजी कार खरेदी वाढत आहे. युक्रेन युद्धामुळे सुट्या भागांच्या तुटवड्यामुळे शनिवारी डिलिव्हरी देणे शक्य होत नाही. याची पूर्वकल्पना दिल्यावर ग्राहक बुकिंग करून ठेवत आहेत, असेही वितरकांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.