आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न सुरक्षेचा बोजवारा:41 हजारांवर हॉटेल्स, स्वीट हाेम, किराणा दुकानातील पदार्थांच्या तपासणीसाठी फक्त 6 अन्न सुरक्षा अधिकारी

औरंगाबाद / संतोष देशमुख2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन २०११ च्या जनगणनेनुसार औरंगाबादेत ३७ लाखांवरील लोकसंख्या ११ वर्षांत पन्नास लाखांवर जाऊन पोहोचली आहे. पर्यटन राजधानी व उद्योग, शैक्षणिक, मेडिकल्स हब आहे. नोंदणीकृत ४१,५७७ आस्थापना (हॉटेल्स, रेस्टॉरंट, किराणा दुकाने, मेडिकल्स, मिठाई व खाद्यपदार्थ विक्रेते) आहेत. या आस्थापनांतून विक्री होणाऱ्या अन्नपदार्थ, गोळ्या, औषधींच्या तपासणीसाठी अन्न-औषध प्रशासनाकडे अवघे सहा अन्न सुरक्षा अधिकारी आहेत. नियमाप्रमाणे एक हजार आस्थापनांमागे एक अधिकारी असायला हवा. मात्र, प्रत्यक्षात शहरात ४ हजार आस्थापनांसाठी एक, तर ग्रामीणमध्ये १० हजार आस्थापनांसाठी एकच अधिकारी असल्याने अन्न व सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे भेसळीचे प्रमाण वाढत आहे.

सणासुदीचा कालावधी सुरू असून पर्यटनही वाढले आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाई, किराणा, मॉल्समध्ये ग्राहकांची संख्या वाढली आहे. दररोज कोट्यवधींची उलाढाल होत आहे. ४१,५७७ हून अधिक नोंदणीकृत, परवानाधारक आस्थापनांतून ही खरेदी-विक्री होते. अन्नपदार्थांचा दर्जा, गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे ६ अन्न सुरक्षा अधिकारी व दोन सहायक आयुक्त आहेत. तेही माहितीच्या आधारे कारवाई करतात. त्यामुळे नागरिकांनी खरेदी केलेल्या अन्नपदार्थांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट होते. हॉटेल्स ४०२, किरकोळ, वितरक, खाद्यपदार्थ विक्री आस्थापना १८९३ , परवानाधारक १७७३, इतर ७५६० असे एकूण ११ हजार ६२८ अशा शहरातील आस्थापना आहेत.

बाजाराची वस्तुस्थिती : अधिक पैसे मोजूनही दर्जेदार पदार्थ मिळेनात औरंगाबादसह मराठवाड्यात नवरात्रीमध्ये निकृष्ट दर्जाची भगर खाल्ल्याने शेकडो जणांना विषबाधा झाली होती. अशाच प्रकारे रोज भेसळयुक्त खाद्यपदार्थ व खाद्यतेल, मिठाई, फरसाण, उपवासाचे पदार्थ विक्री होत आहेत. दिवाळी अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बाजारात सर्वत्र अलोट गर्दी आहे. ग्राहकांना अधिकचे पैसे मोजूनही दर्जेदार, गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थ, मिठाई, खाद्यतेल मिळत नाही. बोगस चहापत्ती, भेसळ व एक्स्पायरी झालेले, उत्पादन तिथी व कधीपर्यंत ते वापरावेत, याचा उल्लेख न केलेले किराणा, खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, औषधी गोळ्या, ब्रँडिंग कंपन्यांची नावे छापून पॅक्ड खाद्यपदार्थ, उघड्यावरील अन्नपदार्थ आदी बाजारात सर्रास विक्री होत आहेत. त्यामुळे लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...