आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादंगलीच्या सातव्या दिवसापर्यंत ४२ दंगेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक तपासात कॉल करून अनेकांना बोलावण्यात आल्याचे निष्पन्न होत आहे. शिवाय आरोपींच्या तोंडी चौकशीतूनदेखील आम्हाला बोलावल्याचे काही जण सांगत आहेत. यातूनच पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडल्याने अधिक संख्येने दंगेखोर निष्पन्न होत आहेत. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने मुख्य दंगेखोरांनी घर सोडल्याचेही आता समोर आले आहे.
किराडपुऱ्यात ३० मार्चच्या रात्रीच समाजकंटकांनी तणाव निर्माण केला. दुचाकीचा धक्का लागल्यावरून दोन तरुणांच्या गटांमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर काही मिनिटांमध्ये दंगलीत परिवर्तित झाले. त्यामुळे दंगेखोर तयारीनिशी आले कसे, दगड, लाठ्या, पेट्रोल बाॅम्बसाठी पेट्रोलचा तयार साठा कोठून उपलब्ध झाला, केवळ पोलिसांची वाहने जाळून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करत मंदिराला लक्ष करण्यासाठी कोणी प्रोत्साहित केले, हे गंभीर प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत. आतापर्यंत ४२ जणांना पकडण्यात आले. त्यांच्या चौकशीतून समोर येणाऱ्या नावांचा कसून शाेध सुरू आहे. निरीक्षक संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली अकरा जणांची एसआयटी यावर काम करत आहे.
पोलिसांचा सर्वाधिक भर तांत्रिक तपास, फुटेजमधून चेहरे शोधण्यावर
आतापर्यंतच्या तपासात पोलिसांचा सर्वाधिक भर तांत्रिक तपासावर आहे. अनेक गुप्त बातमीदारांकडून फुटेजमधील चेहरे ओळखण्याचे काम सुरू आहे. मात्र, आतापर्यंत पकडण्यात आलेल्या आरोपींच्या माेबाइलच्या तपासात घटनेदरम्यान कॉल करून अनेकांना बोलावण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याचाच अर्थ पोलिसांनी सुरुवातीचे वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्या प्रकरणाची री ओढत पुढील सर्व दंगल ठरवून केल्याचे आता स्पष्ट हाेत आहे. पकडलेल्या आरोपींकडून त्या दिशेने तपास सुरू आहे.
नशेखोर दंगेखोरांचा पोलिस कोठडीत रात्रभर आरडाओरडा
दंगेखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना पोलिस कोठडीत ठेवले जात आहे. मात्र, यातील काही दंगेखोर रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचा आरडाओरडा, धिंगाण्यामुळे पोलिस त्रस्त झाले आहेत. रविवारी सिटी चौक परिसरातील अब्दुल नासेर नामक रेकॉर्डवरील नशेखोराने सिडको पोलिस ठाण्याच्या कोठडीत रात्रभर धिंगाणा घातला. कोठडीच्या लोखंडी सळयांवर डोके आपटले. नंतर सोबतच्या दंगेखोरांना मारहाणीचा प्रयत्न केल्याने पोलिसांची धावपळ उडाली. यामुळे सकाळी दहा वाजेपर्यंत पोलिसांना त्रास सहन करावा लागला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.