आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा @ ७०३८:जालन्यात दिवसभरात 43 कोरोना बाधित, नांदेड जिल्ह्यात 18, परभणीत 4 तर लातूरला 17नवे रुग्ण

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी मराठवाड्यातील रुग्णसंख्येने ७ हजारांचा पल्ला ओलांडला. आता मरााठवाड्यातील एकूण बाधितांची संख्या ७०३८ इतकी झाली आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील ५०३७ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान रविववारी औरंगाबाद जिल्ह्यात २७१ रुग्ण सापडलेले असतानाच जालना जिल्ह्यात ४३, उस्मानाबाद ३, नांदेड १८, लातूर १७ आणि परभणी जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४ रुग्ण आढळले आहेत.

जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाने जणू कहर केला असून रविवारी जालना जिल्ह्यात आतापर्यंतचे सर्वाधिक ४३ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५०५ वर जावून पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिवसभरात कोरोनामुक्त १९ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला अाहे. आतापर्यंत ३३६ रुग्ण काेरोनावर मात करून घरी गेल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सातत्याने वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे चिंता कायम अाहे.

लॉकडाऊनमुळे एप्रिल, मे महिन्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. मात्र जूनमध्ये शासनाने अनलॉक जाहीर केल्यानंतर सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहेत. यातही मागील पंधरा दिवसात जवळपास २०० हून अधिक रुग्णांची भर पडली आहे. तर आतापर्यंत १३ जणांचा बळी गेला आहे. जालना शहरातील बाधितांचा आकडा सातत्याने वाढत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासह नागरिकांपुढे उभे राहिले अाहे. यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य व पोलिस यंत्रणेकडूनसुद्धा सातत्याने नागरिकांना स्वत:सह कुटूंब व समाजाची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, काहीजण याकडे अद्यापही लक्ष न देता नियमांची पायमल्ली करत असल्यामुळे कोराेनाचा धाेका वाढला आहे. दरम्यान, कोरोनाशी लढण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. तर जे नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

लातूर जिल्ह्यात १७ तर उस्मानाबादेत ३ नवे रुग्ण : लातूर आणि उस्मानाबाद या शेजारी जिल्ह्यांत रविवारी कोरोनाचे अनुक्रमे १७ आणि ३ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ३२६ झाला आहे. तर उस्मानाबादेतील एकूण रुग्ण संख्या आता २०९ झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन रुग्ण भूम तालुक्यातील तर एक जण परांडा तालुक्यातील आहे.

परभणीत चार रुग्ण वाढले
परभणी |
जिल्हा शासकीय रुग्णालयात संशयित म्हणून दाखल केलेल्या शहरातील दर्गा रस्त्यावरील गंगापुत्र कॉलनी व मध्य वस्तीतील गव्हाणे चौकातील प्रत्येकी एका रुग्णाचा स्वॅब पॉझिटिव्ह निघाला आहे. तसेच जिंतूर शहरातील बामणी प्लॉट व सोनपेठ शहरातील राजगल्लीतील व्यक्ती कोरोनाबाधित आढळू आल्या आहेत. एकूण चार रुग्ण वाढल्याने बाधितांची संख्या १०९ वर पोहाेचली आहे. गव्हाणे चौकातील रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहे.

आमदार हंबर्डे यांना औरंगाबादला हलवले
नांदेड |
जिल्ह्यात रविवारी सायं ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण ११४ अहवालापैकी ७९ अहवाल निगेटिव्ह तर १८ नवीन बाधित रुग्ण आढळले. दरम्यान , नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांना रविवारी पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आले. त्यांचा कोरोना अहवाल शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या कुटुंबातील नऊ सदस्यही बाधित असून यातील तीन जणांना हंबर्डे यांच्यासोबत औरंगाबादला हलवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...