आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज 43 मराठा तरुण, तरुणींनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले. उद्या मुख्यमंत्री शिंदे शहरात असताना त्यांना हे पत्र देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मागणी करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
मनोज पाटील, मुरदारे पाटील, पंढरीनाथ गोडसे, किशोर शिरवत, संतोष कुसेकर , धनंजय चेरेकर, संदीप मोटे, महेश मोरे, योगेश कुटुळे, गोरख चव्हाण, गजानन राजगुडे, अनिल केरे, राजेंद्र जाधव, अनिल कुठे, अमोल पांचाळ, राजेश देशमुख आदी तरुणांनी रक्ताने पत्र लिहिले आहेत.
मराठा तरुण संतप्त
आंदोलक म्हणाले, मराठा समाजातील गोरगरीब अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत. त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे. यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. राज्य सरकारने मराठा समाजासाठी ईडब्ल्युएस आरक्षण लागू केले होते, तेही सुप्रीम कोर्टाने रद्द केले. त्यामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे आज औरंगाबादेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात 43 मराठा मुला व मुलांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले आहे. रविवारी (ता. 31) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र दिले जाणार आहे.
43 पत्रं का?
43 मराठा तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्राणाची आहुती दिली आहे. तसेच, कोपर्डी घटनेतील नराधमांना अद्याप फाशी झालेली नाही. सर्व प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी 43 तरूणांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे सांगण्यात आले.
शिंदेंनी प्रश्न मार्गी लावावा
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रवींद्र काळे-पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य राहिले आहेत. 5 वर्षे त्यांनी सर्व प्रश्नांचा अभ्यास केला आहे. मराठा आरक्षण प्रश्नाची त्यांना चांगली जाणीव आहे. त्यांनी ती जाणीव ठेवून काम करावे. मराठा आरक्षणाकडे शिंदेंनी विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत. तसेच, लवकर आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास येत्या अधिवेशन काळात मराठा मोर्चा काढला जाईल, असा इशारा मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला.
आर्थिक स्थिती भयावह
आंदोलनात सहभागी विद्यार्थी ऋतूजा बागल म्हणाले, मराठा समाजातील अनेकांकडे शेती नाही, बहुतांश समाज अत्यल्प भूधारक आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. पर्यायी व्यवसाय नाही. परिणामी आर्थिक परिस्थिती भयावह आहे. मुला मुलींची शाळेची फी भरण्यासाठीही पालकांकडे पैसे नसतात. कौटुंबिक खर्च भागवणे दुरापास्त झाले आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आरक्षण मिळावे यासाठी आम्ही रक्ताने पत्र लिहिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.