आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:जिल्हयात पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी लागणार ४.४० कोटींचा निधी, जिल्हा प्रशासनाकडून अहवाल सादर

हिंगोली8 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यात यावर्षी सततच्या पावसामुळे ६११९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून जिल्ह्यातील १३३९८ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ४.४० कोटी रुपयांचा निधी आवश्‍यक असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे. त्यामुळे आता शासनाकडून मदतीची शेतकऱ्यांना प्रतिक्षा लागली आहे.

हिंगोली जिल्हयात यावर्षी आता पर्यंत वार्षिक सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पुर आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी महसुल, कृषी व पंचायत विभागाला सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे कळविले होते.

त्यानुसार जिल्हयात जून ते ऑगष्ट अखेर पर्यंत झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये १२२२९ शेतकऱ्यांचे २०३२ हेक्टर सोयाबीन, २८.५० हेक्टर कापूस तर ५ हेक्टर तुरीच्या पिकाचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८०० रुपये हेक्टर या नुसार १.४० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. तसेच ११३३ शेतकऱ्यांचा २३.५० हेक्टर ऊस, ३२१.३३ हेक्टर हळद पिकांचे नुकसान झाले असून मदतीसाठी १३ हजार ५०० रुपये हेक्टर नुसार ४६.५७ लाखाचा निधी लागणार आहे. तसेच ३६ शेतकऱ्यांचे ७.३५ हेक्टर केळीचे नुकसान झाले असून त्यांना मदतीसाठी १८००० रुपये हेक्टर प्रमाणे १.३२ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. या संदर्भातील अहवाल जिल्हा प्रशासनाने नुकताच विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा लागली आहे.

चौकटीचा मजकूर १३३९८ शेतकऱ्यांचे नुकसान जिल्ह्यात १३३९८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ५७६७ हेक्टर जिरायत पिके, ३४४.९८ हेक्टर बागायती तर ७.३५ हेक्टर फळपिके असे एकूण ६११९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामधे शेतकऱ्यांना मदतीसाठी ४.४० कोटी रुपये लागणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...