आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रोजंदारीचे जानेवारी आणि फेब्रुवारीचे वेतन अद्याप न झाल्याने कर्मचाऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या दालनासमोर शुक्रवारी (१० मार्च) त्यांनी ठिय्या आंदोलन केले. यामुळे शनिवारी (११ मार्च) कंत्राटदार एजन्सीच्या खात्यावर विद्यापीठाने आरटीजीएस केले आहे. पण, कुशल कामगार १६६, अकुशल कामगार २७७ असे एकूण ४४३ कर्मचाऱ्यांच्या खात्यावर अद्याप पगार जमा झाला नसल्यामुळे नाराजी कायम आहे.
विद्यापीठातील नियमित प्राध्यापकांचेही पगार रखडले होते. मात्र कंत्राटीच्या आंदोलनानंतर शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता प्राध्यापकांच्या खात्यावर वेतन जमा झाले आहे. पण कंत्राटींना वेतन मिळाले नाही. विद्यापीठातील कार्यरत ४४३ रोजंदारी कामगारांचे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातील वेतन निकृष्ट दर्जाच्या बायोमेट्रिक मशीनमुळे रखडले आहे. रोजंदारी कामगारांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत आस्थापना विभागाचे उपकुलसचिव दिलीप भरड यांच्यासमोर दोन महिन्यांचे वेतन देण्याची मागणी लावून धरली. दोन-दोन महिने वेतन होत नसल्याने प्रपंच कसा चालवयचा, असा प्रश्न संतप्त झालेल्या महिला कामगारांनी कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्यासमोर मांडला होता.
प्रश्न सुटत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कुलगुरूंचे दालन गाठले. कुलगुरूंची बैठक सुरू असल्याने त्यांनी कुलसचिव व उपकुलसचिवांना कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले. दोन महिने पूर्ण होऊन वेतन मिळत नसल्याने कामगारांनी कुलगुरूंचे कार्यालय गाठले. शनिवारी दुपारी कंत्राटदार कंपनी असलेल्या महात्मा फुले मल्टिसर्व्हिसेसच्या खात्यावर ६७ लाख ५४ हजार रुपये जमा झाले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नेते किरणराज पंडित, भगवान निकाळजे, राजदीप सोनवणे, ईश्वर काळे आदींसह शेकडो कर्मचाऱ्यांचा ठिय्या आंदोलनात सहभाग होता.
दोन-दोन महिने पगार दिला जात नाही प्राध्यापकांचे सहा महिने वेतन झाले नाही तरी चालू शकेल, पण आम्हाला मुळातच वेतन कमी आहे. तरीही दोन-दोन महिना पगार दिला जात नाही. बायोमेट्रिक यंत्र जर सदोष असेल त्याची आम्हाला शिक्षा कशाला..? आमचे वेतन थांबले तर कुटुंबीयांचा चरितार्थाचा प्रश्न निर्माण होतो. यापुढे असे होऊ नये याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी. -किरणराज पंडित, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नेते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.