आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:एन-7 जलकुंभावरून भरणारे 46 टँकर एन-1 वर भरणार; पालकमंत्री सुभाष देसाई यांनीदेखील रविवारी झालेल्या बैठकीत दिल्या सूचना

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको-हडको भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. एन-७ आणि एन-६ जलकुंभावरून भरले जाणारे ४६ टँकर आता एन-१ परिसरातील एन-१ च्या टाकीवर हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी एमआयडीसीच्या पाइपलाइनमधून एक एमएलडी (१० लक्ष लिटर) पाणी उपलब्ध होईल, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत पालकमंत्री सुभाष देसाई यांनीदेखील रविवारी झालेल्या बैठकीत सूचना दिल्या आहेत.

याशिवाय हर्सूलमधून पाणीपुरवठ्यात तीन एमएलडी पाणी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत चार एमएलडी पाणी वाढेल, त्यातून पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटेल, असे मानले जात आहे. पालकमंत्री देसाई महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादेत आले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर पाण्याची समस्या मांडली व एमआयडीसीकडून पाणी मिळावे, अशी मागणी केली. देसाई यांनी त्याला प्रतिसाद देत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना तूर्त एक एमएलडी पाणी मनपासाठी देण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने मंगळवारी एमआयडीसीला पत्र लिहून पाण्याची मागणी केली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिली. एमआयडीसीकडून मिळणाऱ्या पाण्याचा उपयोग टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे.

त्यामुळे सिडको एन-५ च्या जलकुंभांवरील ताण कमी होईल आणि सिडको-हडकोचा पाणीपुरवठा काही प्रमाणात सुरळीत होईल, असा दावा कोल्हे यांनी केला आहे. हर्सूल तलावातून सध्या रोज १६ वाॅर्डांना साडेचार एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. हर्सूल तलावात मुबलक पाणी आहे, त्यामुळे या तलावातून आणखी तीन एमएलडी पाणी वाढवता येईल का यासाठी प्रयत्न केला जात आहे, असे कोल्हे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...