आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लॉकडाऊन इफेक्ट:राज्यातील 4.66 लाख कर्मचाऱ्यांनी ‘पीएफ’मधून उचलले 1650 कोटी; सर्वाधिक उचल मुंबईतून

औरंगाबाद, नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाशिक विभागातून 38, तर औरंगाबादेत 37 कोटींची उचल

लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) राज्यातील ४ लाख ६६ हजार कर्मचाऱ्यांनी १६५० कोटी रुपयांची रक्कम काढली आहे. त्यात मुंबईतील नोकरदारांची सर्वाधिक संख्या असून मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत येथून ३ लाख कर्मचाऱ्यांनी १३०० कोटींची उचल केली आहे. “वर्तमाना’त तगण्यासाठी “भविष्या’ची तरतूद असलेल्या ईपीएफमधून कर्मचाऱ्यांनी पैसे काढल्याचे चित्र आहे.

कोविड १९ मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी पीएफमधून अग्रिम रक्कम उचलण्याची खास तरतूद केंद्रीय वित्त मंत्रालयाने जाहीर केली होती. भविष्य निर्वाह निधी कायद्यातील परिच्छेद ६८ एल (३) नुसार जाहीर करण्यात आलेल्या या खास सवलतीत कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक वेतनाच्या तीन महिन्यांची रक्कम किंवा खात्यात जमलेल्या निधीपैकी ७५ टक्क्यांपर्यंतचा निधी यापैकी कमी रक्कम आगाऊ घेण्यास परवानगी देण्यात आली होती. राज्यातील ४ लाख कर्मचाऱ्यांनी ‘पीएफ’मधून उचल केली आहे.

सर्वाधिक उचल मुंबईतून

मुंबईत भविष्य निर्वाह निधीची दोन क्षेत्रीय कार्यालये आहेत. त्यापैकी वांद्रे कार्यालयाच्या परिक्षेत्रातून अडीच लाख सभासदांनी या काळात पीएफ काढला. त्यापैकी १ लाख ६० हजार सदस्यांनी, तर ठाणे कार्यालयाच्या परिक्षेत्रातून २ लाख २० हजार कर्मचाऱ्यांनी पीएफ काढला. त्यापैकी १ लाख ७० हजार सदस्यांनी कोविड १९ पॅकेजअंतर्गत पैसे काढले.

नाशिकमधून ३८ कोटी, सर्वाधिक कर्मचारी एचएएलचे : 

नाशिक परिक्षेत्रातून ३८ कोटी कर्मचाऱ्यांनी या काळात पीएफमधून उचल घेतली. यात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याच नाशिकमधील एचएएल या सार्वजनिक क्षेत्रातील, तर बॉश या खासगी क्षेत्रातील उद्योगांच्या कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक पीएफ उचलला.

औरंगाबादमधून ३७ कोटी, तर नागपुरातून ३३ कोटी

औरंगाबाद क्षेत्रातील १६,०७१ सभासदांनी पीएफच्या क्लेमसाठी अर्ज केले. त्यापैकी ७४०० अर्ज ऑनलाइन आले होते, तर ८६०० अर्ज प्रत्यक्ष आले. याद्वारे ३७ कोटी ५० लाख रुपयांची उचल पीएफमधून झाली. नागपूर क्षेत्रात १९,२१२ सभासदांनी उचल मिळण्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी १६,०७८ जणांनी ३३ कोटी ५२ लाख ४८ हजार १०३ रुपयांचा निधी काढला.

पुणे विभाग : २६१ कोटी पीएफ काढला

पुणे क्षेत्रीय कार्यालयात लॉकडाऊनच्या काळात १ लाख १३ हजार ८६८ सभासदांनी पीएफ काढण्यासाठी दावे दाखल केले होते. कोविड १९ या पॅकेजचा लाभ घेण्यासाठी ८२ हजार कंपन्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १० हजार ३९० कंपन्यांचे दावे मंजूर झाले असून तेथील २ लाख ७ हजार कर्मचाऱ्यांनी पीएफमधून २६१ कोटी रुपयांची उचल घेतली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५६ हजार ४०० कर्मचाऱ्यांनी ३४ कोटी ९७ हजारांची उचल घेतली.

‘टाटा कन्सल्टन्सी’च्या कर्मचाऱ्यांनी काढले ४३ कोटी

कोविड १९ अंतर्गत ना परतफेड उचल घेणाऱ्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या मुंबईतील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. या कंपनीच्या मुंबईतील ९,३७३ कर्मचाऱ्यांनी आपल्या पीएफ खात्यांमधून ४३ कोटी ३४ लाख अॅडव्हान्स उचलला आहे. हिंदुस्तान पेट्रोलियमच्या मुंबईतील ४६१ कर्मचाऱ्यांनी १४ कोटी ३३ लाख रुपयांची उचल काढली. देशातील २२२ खासगी उद्योगांमधील कर्मचाऱ्यांनी पीएफमधून उचल घेतली आहे.