आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:मेल्ट्रॉन हॉस्पिटलमधून 48 रेमडेसिविर गायब, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नोटीस

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटरमधून ४८ रेमडेसिविरचा बॉक्स गायब झाला आहे. मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्यापर्यंत हा प्रकार जाताच त्यांनी सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करा, असे आदेश दिले. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आधी चौकशी करूयात, असे म्हणत कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी मेल्ट्रॉनसाठी इंजेक्शनचे तीन बॉक्स देण्यात आले होते. त्याची रीतसर नोंद करून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. पण त्यापैकी दोनच मेल्ट्रॉनला पोहोचले. चोवीस तासांनंतर झालेल्या तपासणीत एक बॉक्स गायब झाल्याचे उघड झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पांडेय यांना माहिती दिली. तेव्हा ते प्रचंड अस्वस्थ, संतप्त झाले. मात्र, सद्य:स्थिती लक्षात घेता गुन्हा दाखल करण्यापूर्वी बॉक्सची जबाबदारी असलेल्यांना कारणे दाखवा नोटीस बजावू. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आले नाही तर गुन्हा दाखल करू, असा मार्ग अधिकाऱ्यांनी सुचवला. तो पांडेय यांनी नाराजीने मान्य केला. त्यानुसार हातात नोटीस पडताच उत्तर द्या, असे बजावणारे पत्र २७ एप्रिल रोजी तीन जणांना देण्यात आले आहे. मनपाचे फार्मासिस्ट एस. जी. रगडे म्हणाले की, मी कर्मचाऱ्यांमार्फत औषधींचा साठा मेल्ट्रॉन किंवा अन्य कोविड सेंटरला पाठवतो. रेमडेसिविर गायब झाल्याची मला तरी माहिती नाही.

बॉक्स गायब, चोरी नाही
दिव्य मराठी प्रतिनिधीने मंगळवारी रात्री उशिरा मनपाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, प्रकरण गंभीर आहे. एक बॉक्स गायब झाला आहे. मात्र, त्याला चोरी असे म्हणता येणार नाही. म्हणून नोटिसा बजावल्या आहेत.

मला सांगता येणार नाही
अजूनपर्यंत तरी आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. पण बॉक्स गायब झाले आहेत किंवा नाही, याबाबत मी काहीही सांगू शकत नाही. - डॉ. बी. एस. राठोडकर, नियंत्रक, औषधी भांडार, मनपा

बातम्या आणखी आहेत...