आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा:ठाणे, उस्मानाबाद, पुणे, अहमदनगर, नाशिक संघांची उपांत्य फेरीत धडक

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड जिल्हा खो-खो संघटनेतर्फे आयोजित ४८ व्या कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेतील उपउपांत्य फेरीचे सामने चुरशीचे झाले. कुमार गटात ठाणे वि. उस्मानाबाद व पुणे वि.अहमदनगर आणि मुलींमध्ये उस्मानाबाद वि. ठाणे व सांगली वि. नाशिक संघ उपांत्य फेरीत भिडणार आहेत.

धाटाव (ता. रोहा) येथील कै. नथुराम पाटील क्रीडानगरीत एम. बी. मोरे फाऊंडेशन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सुरु असलेल्या स्पर्धेत कुमार गटाच्या उपउपांत्य सामन्यात अहमदनगरने मुंबईचा १४-१३ असा १ गुण १ मिनिट राखून पराभव केला. अहमदनगरच्या सुयश क्षीरसागर (२.२०, १ मि. संरक्षण व ३ गुण ), शिवम बामदळे (१.१०, १.१० मि. संरक्षण, व ४ गुण ), किशोर खवळे (१.५०, १.३० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. मुंबईच्या विशाल खाके (१.३०, १.५० मि. संरक्षण व ३ गुण), हर्ष कामतेकर (१.२०, १ मि. संरक्षण व २ गुण) यांनी जोरदार लढत दिली. दुसऱ्या सामन्यात पुण्याने सांगलीचा १५-१४ असा ३ मि. राखून १ गुणाने पराभव केला.तिसऱ्या सामन्यात ठाण्याने मुंबई उपनगरचा १५-१४ असा ६ मि. राखून १ गुणाने पराभव केला. चौथ्या सामन्यात उस्मानाबादने सोलापूरवर १७-१५ अशी चुरशीच्या सामन्यात २ गुणांनी बाजी मारली. उस्मानाबादच्या श्रीशभो पेठे (१.१०, २.२० मि. संरक्षण व ५ गुण), भरतसिंग वसावे (१.३०, १.४० मि. संरक्षण व २ गुण) यांच्या खेळाच्या जोरावर सामना खिशात घातला.

कल्याणी, प्रीती, संध्या चमकले

मुलींमध्ये ठाण्याने सोलापूरवर १७-१६ असा एक गुणांनी विजय नोंदवला. सामना बरोबरीत झाल्यावर नऊ मिनिटाच्या जादा डावात सोलापूरने ठाण्याचे ५ गडी बाद केले. तर ठाण्याने ६ गडी बाद करत सामन्यावर विजयी मोहोर उमटवली. ठाण्याच्या कल्याणी कंक (नाबाद ३.२०, २ मि. संरक्षण व २ गुण ), काजल शेख (१.५०, २ मि. संरक्षण ) यांची चांगली कामगिरी केली. सोलापूरच्या प्रीती काळे (२ मि. संरक्षण व ५ गुण ) संध्या सुरवसे (२, २, १.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी चमकदार खेळ केला.

नाशिकची रत्नागिरीवर मात

उस्मानाबादने अहमदनगरचा १७-५ असा १ डाव १२ गुणांनी तर नाशिकने रत्नागिरीचा ११-६ असा एक डाव ५ गुणांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, सांगलीने पुण्याला परभवाचा धक्का दिला. हा सामना सांगलीने १२-१० असा २ गुण व २ मिनिटे राखून जिंकला.

बातम्या आणखी आहेत...