आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन:दामदुपटीचे आमिष दाखवून अॅस्ट्रलकडून 5 कोटींचा गंडा, शेकडो महिलांकडून लाखो रुपये उकळले

औरंगाबाद / दिलीप पाईकराव7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅस्ट्रलने वाटलेल्या पावत्या - Divya Marathi
अॅस्ट्रलने वाटलेल्या पावत्या

आरडीपासून ते प्लॉटिंगपर्यंत गुंतवणूक करीत पाच वर्षांत दामदुपटीची योजना राबवून एका भामट्याने विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यातील शेकडो लोकांना सुमारे ५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती हाती आली आहे. अॅस्ट्रल फाउंडेशनच्या नावाखाली या भामट्याने यवतमाळ शहरातील सुमारे ३० महिलांना किमान २ कोटी रुपयांना फसवले. यात एका महिलेकडून गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल २८ लाख रुपये उकळण्यात आले आहेत. एकूणच मराठवाड्यातील जालना, नांदेड, विदर्भातील अमरावती, यवतमाळ, पुसद, चंद्रपूर, बुलडाणा तसेच जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यातही नेटवर्क असून त्याने एकूण ५ कोटींचा गंडा घातल्याचा संशय आहे.

यवतमाळ शहरातील आर्णी रोडवर भाऊसाहेब ऊर्फ भाऊ दयाराम शिंदे याने जानेवारी २०१५ मध्ये अॅस्ट्रल लँड मॅनेजमेंट अँड मल्टी अॅग्रो सोल्युशन इंडिया लि. या नावाने कार्यालय थाटले. ही कंपनी युवा विकास, आरोग्य, कृषी आणि प्लॉटिंग आदी क्षेत्रांतील अग्रणी कंपनी असल्याचे शिंदे याने भासवून फसवणुकीचे जाळे विणण्यास सुरुवात केली. पाच वर्षे आरडीमध्ये (रिकरिंग डिपॉझिट) दरमहा गुंतवणूक केल्यास पाच वर्षांनंतर दुप्पट रक्कम देण्याचे आमिष त्याने दाखवले. त्याच्या आमिषाला यवतमाळच्या देहानकर ले-आऊटमधील माला अरविंद झाडे ही महिला भुलली.

माला यांना तुम्हाला कंपनीची एरिया मॅनेजर बनवतो, असे आमिषही शिंदे याने दाखवले. माला यांचे पती तेव्हा घाटंजी पंचायत समितीत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. झाडे यांनी छाया वानरे या महिलेच्या माध्यमातून २०१५ मध्ये कंपनीत आरडी गुंतवणुकीला सुरुवात केली. त्यानंतर ३१ जानेवारी २०१६ रोजी माला यांचा पुसद (जि. यवतमाळ) येथे एका सेमिनारमध्ये जंगी सत्कारही करण्यात आला.

कोट्यवधी रुपये जमा होताच गुंडाळला गाशा : माला झाडेंसह इतर महिलांनी कंपनीत आरडीपासून सुरुवात करत प्लॉटिंगपर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यानंतर भाऊसाहेब शिंदे याने २०१५ मध्ये सुरू केलेल्या ऑफिसला २०१८ मध्ये टाळे ठोकत यवतमाळमधून रात्रीतून पळ काढला. दुसऱ्या दिवशी स्टाफ म्हणून नियुक्त केलेले काही जण तसेच महिला या कार्यालयात गेल्या असता कार्यालयाला लावलेले टाळे बघून सगळेच चक्रावून गेले. काही लोकांनी भाऊसाहेब शिंदे याच्याशी संपर्क साधला असता त्याने कार्यालय बंद केले तरी कंपनीचे काम सुरूच असल्याची थाप मारली. मात्र कुणालाही प्लॉट दिला नाही किंवा त्यांनी गुंतवलेल्या पैशांचा परतावा दिला नाही. पुसदमध्येही एका व्यक्तीमार्फत अजूनही त्याची ही भामटेगिरी सुरूच आहे.

कार्यालय यवतमाळला, प्लॉट धरणगावचा : बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे जन्मगाव असलेल्या धरणगाव (जि.जळगाव) येथे अस्तित्वात नसलेले प्लॉट भाऊसाहेब याने विदर्भातील जनतेला विकले. या प्लॉटचे साठेखतही त्याने अनेकांना अॅड. पी. यू. काळुसे पाटील या नोटरीमार्फत करून दिले आहेत. गुंतवणूकदारांनी दिलेल्या रकमेपोटी त्याने त्यांना छापील पावत्या दिल्या. त्यावर प्लॉटचे क्षेत्र ८०० स्क्वेअर फूट दाखवण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याने पावतीवरही लोकांना विश्वास बसावा यासाठी प्लॉट ताब्यात देण्याची तारीख ३१ मार्च २०२१ अशी नोंदवली. शिवाय गुंतवणूकदारांच्या वारसदारांची नावेही टाकली. वर्षाला २२ हजार रुपयांचा हप्ता पाडून देण्यात आला. लोकांनी सुमारे साडेतीन ते चार वर्षे हप्ते जमा केल्यानंतर शिंदे याने आपले ईप्सित साधले.

गुंतवणुकीस भाग पाडले : माला झाडे यांना एरिया मॅनेजर म्हणून घोषित केल्यानंतर शिंदे याने त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. झाडे यांनी सर्वप्रथम ५ लाख रुपये गुंतवले. या मोबदल्यात अॅस्ट्रलने त्यांना धरणगाव (जि. जळगाव) येथील एक प्लॉट देण्याचे मान्य केले. त्याचे साठेखतही नोटरीमार्फत करून दिले. त्याही नंतर शिंदे आणि कंपनीने त्यांना अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी दबाव आणत एकूण २८ लाख रुपये उकळले.

बड्या अधिकारी पदांचा बनाव
माला झाडे यांच्या सत्कार समारंभाला भाऊसाहेब शिंदे हा कंपनीचा एमडी म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचा डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग ऑफिसर लीलाधर पाटील, अॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसर ज्ञानेश्वर वानखेडेकर, लँड अॅडव्हायझर प्रभाकर जगताप आदी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या सत्कारामुळे माला झाडे भारावून गेल्या. त्यानंतर शिंदे याने माला झाडे व इतर महिलांच्या माध्यमातून लोकांना आपल्या फसव्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. एक-एक करत सुमारे ३० महिला व पुरुष कंपनीत सहभागी झाले.

वेबसाइट, ई-मेल व दूरध्वनी क्रमांकही बनावटच
भाऊसाहेब शिंदे याने गुंतवणूकदारांना सांगितलेले संकेतस्थळ (वेबसाइट), ई-मेल आयडी आणि दूरध्वनी क्रमांक सर्वच बनावट आहे. शिंदे याने मुख्यालय म्हणून गुंतवणूकदारांना औरंगाबाद येथील सानिया चेंबर, सेव्हन हिल्स हा पत्ता दिला होता. मात्र त्याने केवळ ६ महिन्यांसाठीच हे कार्यालय थाटले होते. ‘दिव्य मराठी’ने या पत्त्यावर जाऊन शहानिशा केली असता तेथे असे कोणतेच कार्यालय आढळून आले नाही. तीन महिन्यांचे भाडेही त्याने बुडवले असल्याचे गाळामालकाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...